रोजगार हमी योजनेची कामे ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 11:15 PM2021-07-18T23:15:11+5:302021-07-19T00:23:15+5:30
सायखेडा : निफाड तालुक्यातील तारुखेडले या गावातील नोंदणीकृत मंजुरांना रोहयो अंतर्गत कामे मिळावी यासाठी तारुखेडले गावकऱ्यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी (रोहयो) नाशिक यांना निवेदन दिले आहे.
सायखेडा : निफाड तालुक्यातील तारुखेडले या गावातील नोंदणीकृत मंजुरांना रोहयो अंतर्गत कामे मिळावी यासाठी तारुखेडले गावकऱ्यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी (रोहयो) नाशिक यांना निवेदन दिले आहे.
तारुखेडले गावात अनेक रोहयो अंतर्गत नोंदणीकृत मजूर आहेत. परंतु सध्या त्यांच्या हाताला काही कामे नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे व उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व कठोर नियम व लॉकडाऊनमुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रोहयो अंतर्गत ग्रामीण भागातील मजुरांना शासनाने ग्रामीण भागात जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे, यासाठी विभागाने ग्रामपंचायतस्तर व इतर यांना कामाचे नियोजन करण्याची सूचना करावी, तारुखेडले गावात यापूर्वी वन विभागाची रोपवाटिका सुरू होती. त्यामुळे मजुरांना रोजगार मिळत होता. आता रोपवाटिकेमध्ये काम बंद असल्यामुळे मजुरांच्या हाताला कामे नाहीत, तसेच विभागाने कामाचे नियोजन केल्यास गावातील मजुरांना काम मिळेल व त्यांना मदत होईल.
यापूर्वी जी कामे रोहयोअंतर्गत तारुखेडले गावात झाली असतील व मजुरांना त्यांच्या खात्यात पगार वितरित झाला असेलच त्याचे एकदा विभागाने लेखापरीक्षण करावे, कारण गरीब मजूर जो खरा काम करतो त्यालाच त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. गावात रोहयोअंतर्गत कामाचे व मजुरांच्या मस्टरची तपासणी केली पाहिजे.
रोहयो विभागाने काही योजना असतील तर त्या ग्रामपंचायत स्तरावर त्याची माहिती नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केली पाहिजे. जास्तीत जास्त गावांतील मजुरांची नोंदणी करून त्यांना कामे दिली गेली पाहिजेत, रोहयोअंतर्गत पाणंद रस्ते, वृक्षलागवड, गोठा बांधणे, स्मशानभूमी, वृक्ष लागवड कामे व इतर कामे सर्व नोंदणीकृत मजुरांकडून करून घेतली पाहिजेत. त्यांना जॉब कार्ड वितरित झाले आहे का, त्याची तपासणी केली पाहिजे. यासाठी रोहयो विभागाने ग्रामपंचायत स्तरावर वेळोवेळी आवश्यक सूचना देणे गरजेचे आहे, असे निवेदनात तारुखेडले येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गवळी यांनी म्हटले आहे.