जिल्ह्यात ऊर्जा विकासाच्या कामांवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 01:00 AM2018-11-13T01:00:15+5:302018-11-13T01:00:52+5:30
महावितरणने नाशिक जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत ऊर्जा विकासाला चालना दिली असल्याने सुमारे ४६० कोटींची कामे करून वीज वितरणचे जाळे निर्माण केले आहे. जिल्ह्यातील वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्याच्या उद्देशाने यंत्रणेचे बळकटीकरण करण्यात आल्याचे होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी सांगितले.
नाशिक : महावितरणने नाशिक जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत ऊर्जा विकासाला चालना दिली असल्याने सुमारे ४६० कोटींची कामे करून वीज वितरणचे जाळे निर्माण केले आहे. जिल्ह्यातील वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्याच्या उद्देशाने यंत्रणेचे बळकटीकरण करण्यात आल्याचे होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी सांगितले. महावितरण कंपनीच्या चार वर्षांच्या कामकाजाच्या आढावा पुस्तिकीचे प्रकाशन पाठक यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. यावेळी कोकण प्रादेशिक विभागाचे संचालक श्रीकांत जलतारे, लघु व मध्य उद्योग महामंडळाचे अध्यक्ष प्रदीप पेशकार, महापारेषणचे मुख्य अभियंता जयंत वीके, महावितरणचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर आदी उपस्थित होते. यावेळी पाठक म्हणाले, सर्वोत्तम सेवा देण्याच्या उद्देशाने महावितरणने गेल्या चार वर्षांत वीज यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी मूलभूत सुविधा निर्मितीची भरीव कामे केली आहेत. त्यासाठी प्रामुख्याने पायाभूत विकास आराखडा टप्पा-२, एकात्मिक ऊर्जा विकास योजना, दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, पुनर्रचित गतिमान ऊर्जा विकास व सुधारणा कार्यक्रम, जिल्हा नियोजन विकास समिती आदी योजनांच्या माध्यमातून नवीन उपकेंद्र उभारणी, अतिरिक्त उपकेंद्र रोहित्र, उपकेंद्र रोहित्र क्षमता वाढ, नवीन वितरण रोहित्र, वितरण रोहित्रांच्या क्षमतेत वाढ आदी कामे पूर्ण झाली आहेत व काही कामे प्रगतिपथावर आहेत. गत चार वर्षांत जिल्ह्यात विविध योजनांतून ऊर्जा विकासाची ४६० कोटी रुपयांची कामे झाली आहेत. तर ४९६ कोटी रुपयांच्या खर्चाची कामे प्रगतिपथावर आहेत.
सौभाग्य योजनेतून विद्युतीकरणापासून वंचित असलेल्या कुटुंबीयांच्या मोफत वीजजोडणी, दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपासाठी अटल सौर कृषिपंप योजना, शेतकºयांना दिवसा अखंडित वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी, पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपांना जोडणी देण्यासाठी उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) या महत्त्वाकांक्षी योजनांची यशस्वी अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे.