भगूर बसस्थानकाचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 01:08 AM2019-07-30T01:08:14+5:302019-07-30T01:08:54+5:30
भगूर बसस्थानकाचे काम पूर्ण होत नसल्याने नागरिकांमधून एसटी महामंडळावर नाराजीचा सूर उमटत आहे.
देवळाली कॅम्प : भगूर बसस्थानकाचे काम पूर्ण होत नसल्याने नागरिकांमधून एसटी महामंडळावर नाराजीचा सूर उमटत आहे.
मागील वर्षी जुलै महिन्यात शिवसेनेचे युवराज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भगूर बसस्थानकाचे भूमिपूजन मोठ्या दिमाखात करण्यात आले होते. सदर बसस्थानकाचे काम नोव्हेंबर २०१८ रोजी पूर्ण होणार होते. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने अंदाजे एक कोटी रुपये खर्च करून बसस्थानक बनविण्यात येत असले तरी गेले वर्षभर प्रवासीवर्ग मैदानावर उभे राहून बसचा प्रवास करण्यासाठी ऊन, वारा व पाऊस सहन करत आहे. बसस्थानकाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून अधिकारी वर्गच दुर्लक्ष करत असल्याने ४ आॅगस्ट रोजी होणारे उद्घाटन होणार का नाही? असाच प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. दररोज दोनशेपेक्षा जास्त बसेस येणाऱ्या स्थानकावर सध्या १०० बसेसही येत नसून पासधारक विद्यार्थी मात्र दोन हजारापेक्षा जास्त आहेत. भगूर ते शालिमार बसने ३० तर खासगी काळ्या-पिवळ्या गाडीने २५ रुपयांची आकारणी करण्यात येते. असे असून बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. बसस्थानकाचे काम त्वरित करावे, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष तानाजी करंजकर, शिवसेनेचे श्याम ढगे, विक्रम सोनवणे, सचिन करंजकर, नारायण करंजकर, राष्टÑवादी कॉँग्रेसचे शिवाजी करंजकर, प्रताप करंजकर, कॉँग्रेसचे नगरसेवक मोहन करंजकर, शिवाजी गायकवाड आदींनी सर्व पक्षीयांच्या वतीने केली आहे.
कामाचा वेग मंदावला
बसस्थानकाबाबत आमदार घोलप यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्यानंतर काही काळ काम वेगात सुरू होते. पण गेल्या १५ दिवसांपासून कामाचा वेग अतिशय मंदावला असून ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ ब्रीदवाक्य घेऊन मिरवणारे अधिकार वर्ग भगूर बसस्थानकाच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे प्रवासी वर्गाकडून सांगितले जात आहे.