सिंचन प्रकल्पाची कामे संथगतीने हेच दुर्दैव!
By admin | Published: November 3, 2015 11:58 PM2015-11-03T23:58:16+5:302015-11-03T23:58:40+5:30
अशोक सोनवणे : ‘जल व्यवस्थापन’ विषयावर साधला संवाद
नाशिक : राज्यातील सर्व शहरे ही धरणांच्या पाण्यावर अवलंबून आहेत. तसेच ४८ टक्के वेगाने नागरीकरण होत असल्याने राज्याची तहान भागविणे हे फार मोठे आव्हान सरकारपुढे निर्माण झाले आहे. कारण महाराष्ट्रात सातत्याने कमी पाऊस होतो. त्यामुळे जोपर्यंत राज्यात सिंचन प्रकल्पांच्या कामांना वेग दिला जाणार नाही तोपर्यंत ‘पाणी युद्ध’ मिटणार नाही, असे प्रतिपादन जल व्यवस्थापन व कृषिशास्त्राचे अभ्यासक प्रा. अशोक सोनवणे यांनी केले.
रोटरी क्लब आॅफ नाशिकच्या वतीने गंजमाळ येथील रोेटरी सभागृहात आयोजित व्याख्यानामध्ये सोनवणे बोलत होते. यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्रात शेतीशास्त्राचा सूक्ष्म अभ्यास होणे गरजेचे असून शेतीला किती पाणी द्यायचे अन् पाण्याचा वापर कसा करायचा यावर सखोल विचार होणे गरजेचे आहे. राज्यात समन्वयाचे पाणी वाटपाचे सूत्र बिघडल्यामुळे पाणी पेटले आहे. महाराष्ट्र हे शेती उत्पादन व पावसाबाबतीत तुटीचे राज्य राहिले आहे. महाराष्ट्र दुष्काळाचा सामना पन्नास-शंभर वर्षांपासून करत आला आहे, असे नाही तर शिवरायांच्या काळापासून या महाराष्ट्राने दुष्काळ अनेकदा बघितलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने शेतीच्या अर्थशास्त्राचा सूक्ष्म अभ्यास के ला आणि जल व्यवस्थापनाचे सूत्र मांडले ते अंमलात आणणे गरजेचे असल्याचे सोनवणे यावेळी म्हणाले.
पावसाबाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो; मात्र भारतात होणाऱ्या पावसामध्ये प्रदेशनिहाय फरक जाणवतो. मेघालय, आसाम राज्यात तेरा हजार मिलिमीटर इतके पर्जन्यमान आहे, तर राजस्थान राज्यात शंभर ते दीडशे पर्जन्यमान आढळते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अंबोली परिसरात सहा ते सात हजार मिलिमीटर इतके पर्जन्यमान आहे, तर अहमदनगर जिल्ह्याच्या परिसरात १५० ते २०० इतक्या प्रमाणात पर्जन्यमानाची स्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राहणाऱ्या जनतेला आणि सरकारला नैसर्गिक जलसंपत्तीच्या वापराचे शास्त्र हे समजून घेतल्याशिवाय पर्याय नसल्याचे सोनवणे यांनी सांगितले. राज्यातील तीस हजार खेडी पाण्याचा दुष्काळाला सामोरे जाताहेत. यासाठी जमिनीची भूजल पातळी वाढविणे गरजेचे असून विपुल वृक्षसंपदा निर्माण करण्याची खरी गरज राज्याला आहे. कारण वृक्ष, गवतामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते आणि भूजल पातळी वाढते, असे ते यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी)