दरमहा वेतनाइतके तरी काम करा : डॉ. भारती पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 12:52 AM2021-11-24T00:52:39+5:302021-11-24T00:53:26+5:30
आढावा बैठकीत माहिती लपवून काही होणार नाही. त्यापेक्षा गरजू आदिवासी लाभार्थींची कामे करा, पगाराइतके तरी काम करा, जेणेकरून घरी जाऊन समाधानाची झोप घेता येईल, नाही तर वरच्या (देवाच्या) कोर्टात हिशेब द्यावा लागतो याचे भान ठेवा, अशा शब्दांत केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कळवण तालुक्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आढावा बैठकीत सुनावले.
कळवण : आढावा बैठकीत माहिती लपवून काही होणार नाही. त्यापेक्षा गरजू आदिवासी लाभार्थींची कामे करा, पगाराइतके तरी काम करा, जेणेकरून घरी जाऊन समाधानाची झोप घेता येईल, नाही तर वरच्या (देवाच्या) कोर्टात हिशेब द्यावा लागतो याचे भान ठेवा, अशा शब्दांत केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कळवण तालुक्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आढावा बैठकीत सुनावले.
कळवण पंचायत समितीच्या सभागृहात डॉ. पवार यांनी सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांची तालुक्यात सुरू असलेल्या कामांबद्दल आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीत खातेनिहाय विचारलेल्या प्रश्न व समस्यांबाबत एकाही खातेप्रमुखाला मुद्देसूद उत्तर देता आले नाही. तसेच आढावा बैठकीत देण्यात आलेल्या लेखी कागदपत्रात अपूर्ण माहिती देण्यात आली. तसेच तालुक्यात किती अपंग व्यक्ती आहेत, असा प्रश्न यंत्रणेला विचारल्यानंतर कोणालाच उत्तर देता न आल्याने राज्यमंत्री डॉ पवार यांनी डोक्याला हात लावून संताप व्यक्त केला. तहसीलदार कापसे यांना संजय गांधी निराधार योजनेपासून अनेक गरजू लाभार्थी वंचित असल्याचे निदर्शनास आणून दिले तसेच लाभार्थींना रेशन कार्ड मिळत नसल्याने त्यांना अनेक योजनांचा लाभ मिळत नाही त्यामुळे लवकरात लवकर रेशन कार्ड उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना केली.
गटविकास अधिकारी पाटील यांना रमाई घरकुल योजनेबाबत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चव्हाण यांना आरोग्याबाबत, बालविकास प्रकल्प अधिकारी सहाणे यांना कुपोषित बालकांच्या संख्येबाबत मुद्देसूद सांगता न आल्याने डॉ. पवार यांनी चिंता व्यक्त केली. वीजवितरण, भारनियमन, मका खरेदी केंद्र यासह विविध तक्रारींचा पाऊस या बैठकीत पडला. कळवणच्या मेनरोडच्या कामाबाबत संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी सर्व व्यापारी बांधवांनी यावेळी केली.
बैठकीस भाजप तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, जि. प.चे अर्थ व बांधकाम सभापती रवींद्र देवरे, राज्य कार्यकारिणी सदस्य एन. डी. गावीत, शहराध्यक्ष निंबा पगार, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष गोविंद कोठावदे, तालुका सरचिटणीस डॉ. अनिल महाजन, सचिन सोनवणे, एस. के. पगार, हेमंत रावले, चेतन निकम, संदीप अमृतकर, विश्वास पाटील, सुनील बस्ते, तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, वि.का. सोसायटी चेअरमन, संचालक, भाजप पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.