मालेगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची कामे सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:14 AM2021-05-06T04:14:23+5:302021-05-06T04:14:23+5:30
मालेगाव : मालेगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे काम कोरोना संकटातही सुरू असून कोरोनाकाळात लोकांची गर्दी होईल, अशी शिबिरे घेण्यात ...
मालेगाव : मालेगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे काम कोरोना संकटातही सुरू असून कोरोनाकाळात लोकांची गर्दी होईल, अशी शिबिरे घेण्यात येत नाहीत. लोकांना कोरोना संसर्ग होऊ नये, याची काळजी घेण्यात येत असून फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यात येत असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बीडकर यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यात आणि कसमादेना परिसरात कोरोनाचा उद्रेक वाढत असून मृत्यूचे प्रमाण वाढल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे कोरोनाकाळात बाधितांना रुग्णवाहिका वेळीच उपलब्ध व्हावी तसेच ऑक्सिजन वेळीच मिळून त्यांचे प्राण वाचावे, यासाठी ऑक्सिजन सिलिंडर्सची वाहतूक केली जाणारी वाहने अधिग्रहित करण्याचे काम मालेगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालय करीत आहे.
सुरू असलेली कामे
मालेगाव उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे काही कामे सुरू आहेत. त्यात कळवण, सटाणा, देवळा, नांदगाव व मालेगाव तालुक्यातील शासकीय रुग्णालयांकरिता रुग्णवाहिका अधिग्रह. करण्याचे काम सुरू आहे. परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत असून रुग्णांना आरोग्य सेवा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिकांची गरज पडू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर मालेगाव उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे पाचही तालुक्यांतून रुग्णवाहिका अधिग्रहण करण्यात येत आहेत.
कोरोनाबाधितांना वेळीच ऑक्सिजन मिळत नसल्याने रुग्ण दगावत असल्याने ऑक्सिजन मिळविण्यासाठी धावपळ होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांकडून ऑक्सिजन प्लांट निर्मितीचे आणि ऑक्सिजन सिलिंडर्सचा पुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मालेगावच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून ऑक्सिजन सिलिंडर व अन्य अत्यावश्यक शासकिय वाहतुकीसाठी ट्रक, टेम्पो व क्रेन आदी वाहने अधिग्रहण करण्याचे काम करण्यात येत आहे. त्यानुसार व्यावसायिक संवर्गातील ट्रक, टेम्पो, मालवाहू वाहने आदी नवीन वाहनांची नाेंद केली जात आहे.
१३ एप्रिलपर्यंत विक्री झालेल्या खाजगी नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. तर, वायुवेग पथकाद्वारे रस्त्यावरील वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, याकरिता शेजारील राज्यातील बाधित व्यक्तींनी राज्यात प्रवेश करू नये, यासाठी राज्याच्या सीमेवरील सीमा तपासणी करण्यात येत आहे. यासाठी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. १३ एप्रिलपूर्वी सादर करण्यात आलेल्या अर्जांवरील कार्यालयातील अंतर्गत कामकाज मालेगावी उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे करण्यात येत आहे.
इन्फो..
बंद असलेली कामे
मालेगावच्या उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे वाहनचालकांना शिकाऊ परवाने देण्याचे काम बंद करण्यात आले आहे. तसेच पक्की अनुज्ञप्ती (पर्मनंट लायसेन्स) देखील देण्याचे काम बंद आहे. या उपविभागातर्फे कळवण, सटाणा, देवळा, नांदगाव, मनमाड या तालुक्यांमध्ये घेण्यात येणारी शिबिरे रद्द करण्यात आली आहेत. १३ एप्रिलनंतर विक्री झालेल्या खासगी नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे.
वाहन हस्तांतरण, लायसन्स नूतनीकरण, पत्ताबदल, दुय्यम कागदपत्रे देण्याचे कामदेखील कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनाच्या आदेशानुसार बंद करण्यात आले आहे. योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण (फिटनेस सर्टिफिकेट) देण्याचे कामदेखील बंद करण्यात आल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बीडकर यांनी सांगितले.