गौरवामुळे कामासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:35 AM2020-12-04T04:35:56+5:302020-12-04T04:35:56+5:30
मेजर दीपसिंग : कारगिल युद्धातील कामगिरीबद्दल सन्मान लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : कारगिल युद्धात ज्यांनी प्राणाची बाजी लावून युद्ध ...
मेजर दीपसिंग : कारगिल युद्धातील कामगिरीबद्दल सन्मान
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कारगिल युद्धात ज्यांनी प्राणाची बाजी लावून युद्ध जिंकले आणि यामध्ये त्यांना आपले दोन्हीही पाय आणि एक हात गमवावा लागला असे मेजर दीपसिंग तसेच लाॅकडाऊनच्या काळात विविध प्रकारे कर्तव्य बजावणाऱ्या २७ कोरोनायोद्धयांना कालिका देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना मेजर दीपसिंग यांनी, अशा गौरवामुळे आणि सन्मानामुळे भविष्यातील कार्यासाठी प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले.
नाशिकच्या कालिका देवी मंदिर ट्रस्टच्या सहकार्याने क्रीडा साधना संस्था, डी. एस. फाउण्डेशन आणि नाशिकच्या विविध क्रीडा संस्था, संघटनांच्या वतीने गेल्या ९ वर्षांपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करून ऑलिम्पिक दिवस आणि सप्ताह साजरा करण्यात येतो. या विविध उपक्रमांना संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून भरघोस प्रतिसाद मिळाला; परंतु लॉकडाऊन असल्यामुळे या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करता आला नव्हता तो आता करण्यात आला. त्यात गत ७ -८ महिन्यांपासून कोविड-१९च्या प्रादुर्भावापासून सर्वसामान्य जनतेचा बचाव करण्यासाठी कार्यरत डॉक्टर, नर्स, आरोग्यसेविका, पोलीस, शिक्षक, पत्रकार, सफाई कामगार, विविध खात्यांचे सरकारी कर्मचारी, अन्नदान आणि गरजेच्या वस्तू देणारे सामाजिक कार्यकर्ते यांनाही सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र फेनसिंग असोसिएशनचे सरचिटणीस छत्रपती पुरस्कारप्राप्त डॉ. उदय डोंगरे, कालिका देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील, मविप्रचे क्रीडा विभागप्रमुख प्रा. हेमंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अण्णा पाटील, डॉ. उदय डोंगरे, प्रा. हेमंत पाटील यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक दुधारे यांनी, तर सूत्रसंचालन आनंद खरे यांनी केले.
----------------------------------