जायगाव येथे रेंगाळलेले रस्त्याचे काम अखेर सुरू
By admin | Published: October 21, 2016 01:42 AM2016-10-21T01:42:47+5:302016-10-21T01:45:49+5:30
तत्काळ दखल : महिनाभरापासून काम होते ठप्प; ग्रामस्थांमध्ये समाधान
नायगाव : सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील रस्ता रुंदीकरणाच्या मार्गातील अतिक्रमणे हटविल्यानंतरही शिंदे-पाटपिंप्री रस्त्याचे काम रखडले तसेच गावातील रस्ता मोठ्या प्रमाणात खोदून ठेवल्याने धुळीच्या त्रास आणि अरुंद झालेला रस्ता यामुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी या रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाला. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
महिन्याभरापासून जायगाव येथे गावालगतचा रस्ता खोदून ठेवल्याने गावातील मारुती मंदिर ते देशवंडी फाट्यापर्यंत रस्त्याची एक बाजू खोदण्यात आली आहे. तथापि, रस्ता खोदल्यानंतर अतिक्रमण असल्याची सबब पुढे करीत संबंधित निर्मिती कन्स्ट्रक्शनने हे काम बंद केले होते. खोदकामामुळे रस्ता अरुंद झाल्याने या गर्दीच्या ठिकाणी दोन वाहने जाण्याच्या अडचण निर्माण होत होती. रस्त्याच्या कडेला पडलेल्या माती व धुळीचा प्रवाशांबरोबरच ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. वर्दळीच्या ठिकाणी शाळेतील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांची सकाळ-सायंकाळी चांगलीच दमछाक होत होती. अतिक्रमण काढल्यानंतरही काम रखडले असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध केले होते. यानंतर संबंधित ठेकेदाराने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. तथापि, लवकरात लवकर रस्त्याचे काम मार्गी लावण्याची मागणी जायगाव ग्रामस्थांनी केली आहे.