सटाणा जलवाहिनीचे काम पाडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 01:26 AM2019-07-07T01:26:38+5:302019-07-07T01:26:59+5:30
कळवण : पुनंद प्रकल्पातून सटाणा नगरपालिकेच्या जलवाहिनीच्या कामाला उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली असली तरी या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासह जिल्हा परिषद व अन्य विभागांची परवानगी घेतली नसल्याचे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता रणजित हांडे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर काम बंद पाडले असून, तशी संबंधितांना नोटीसही बजावली आहे.

रस्त्यालगत जलवाहिनी टाकण्यासाठी मशिनरीद्वारे साइडपट्टी खोदून चारी करण्यात येत आहे. सदर काम विनापरवानगीने बेकायदेशीररीत्या सुरू असल्याने ते तत्काळ बंद करावे, या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांची कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने भेट घेतली आणि सटाणा नगरपालिका मुख्याधिकारी व जलवाहिनी योजनेचे ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शिष्टमंडळात आमदार जे. पी. गावित, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, तालुकाप्रमुख अंबादास जाधव, हेमंत पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, संदीप वाघ, जितेंद्र वाघ, किशोर पवार, विलास रौंदळ, संदीप पाटील, शांताराम जाधव, मोहन जाधव यांचा समावेश होता.
चुकीचे व बेकायदेशीर पद्धतीने जलवाहिनी योजनेचे काम चालू केलेले आहे. राज्यमार्गालगत जलवाहिनीचे काम करताना विनापरवानगीने साइडपट्टी खोदून जलवाहिनी टाकण्यात आली असून, त्यावरून माती टाकण्यात आली आहे. रस्त्याच्या मर्यादित सीमेनुसार संबंधित विभागाची परवानगी घेऊन जलवाहिनी मार्ग ठरवून कामकाज करणे आवश्यक आहे; परंतु सर्व निकष डावलून परस्पर रस्त्यालगत साइडपट्टी खोदून अडीच किलोमीटर घाईघाईने काम चालविले असल्याचा आरोप यावेळी जयश्री पवार यांनी केला. रस्त्यालगतची माती पावसामुळे वाहून आल्याने अपघात घडत असून साइडपट्टी पूर्णपणे खोदून व्यवस्थित न बुजल्यामुळे रस्ता देखील खचला आहे. भविष्यात या राज्यमार्गाचे काम करायचे असल्यास चुकीच्या जलवाहिनीमुळे रस्त्याचे काम करता येणार नसल्याचेही यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. शिष्टमंडळाने सदर प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने काम थांबविण्याचे आदेश दिले
आहेत. सटाणा नगर परिषद व जलवाहिनी ठेकेदार यांनी राज्यमार्ग २१ वरील साखळी क्रमांक ३७/०० ते ३९/५०० या रस्त्यादरम्यान चुकीच्या व बेकायदेशीर पद्धतीने जलवाहिनीचे काम सुरू केले आहे. साइडपट्टी खोदून जलवाहिनी टाकली आहे. रस्त्याच्या सीमेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाची कुठलीही परवानगी घेतलेली नाही, त्यामुळे काम बंद करण्यात आले आहे.
- रवींद्र घुले
कार्यकारी अभियंता, आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभाग, कळवण