सहा वर्षांपासून सातपूर बसस्थानकाचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 01:21 AM2020-12-16T01:21:57+5:302020-12-16T01:23:24+5:30
गेल्या सहा वर्षांपासून सातपूर बसस्थानकाचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. वर्षभरात काम पूर्ण होणे अपेक्षित होते; पण काम रेंगाळल्याने दीड कोटीच्या कामाला तब्बल सव्वादोन कोटी रुपये खर्च होऊनही बसस्थानक पूर्णत्वास येऊ शकलेले नाही.
गोकुळ सोनवणे / सातपूर : गेल्या सहा वर्षांपासून सातपूर बसस्थानकाचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. वर्षभरात काम पूर्ण होणे अपेक्षित होते; पण काम रेंगाळल्याने दीड कोटीच्या कामाला तब्बल सव्वादोन कोटी रुपये खर्च होऊनही बसस्थानक पूर्णत्वास येऊ शकलेले नाही. मनसेचे तत्कालीन आमदार नितीन भोसले यांनी सातपूर गावातील बसस्थानकाच्या कामासाठी दीड कोटी रुपयांचा आमदार निधी शासनाकडून मंजूर करून आणला होता. २०१४ साली भोसले यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बसस्थानक नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन केले. निवडणुकीत भोसले यांचा पराभव होऊन भाजपच्या सीमा हिरे निवडून आल्या. दरम्यान बराच काळ बसस्थानकाचे काम रेंगाळले होते. निधीअभावी ठेकेदाराने काम करण्यास नकार दिला. नागरिकांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन हिरे यांनी बसस्थानकाच्या कामासाठी सरकारकडून ५० लाख रुपयांचा आमदार निधी मंजूर करून आणल्यानंतर कामास सुरुवात झाली. हिरे यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला, मात्र बसस्थानकाचे काम रेंगाळले. या पाच वर्षांच्या कार्यकाळात आमदार हिरे यांनीही ‘फक्त’ विस्तारित कामाचे भूमिपूजन करून घेतले होते.
वास्तविक पाहता त्याकाळी दीड कोटी रुपयांत बसस्थानकाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. आमदार हिरे यांनी त्यांच्या पंचवार्षिक काळात ५० लाखांचा आमदार निधी उपलब्ध करून दिला. आणि आता पुन्हा २५ लाख रुपयांचा आमदार निधी उपलब्ध करून दिला आहे. या २५ लाख रुपयांच्या विस्तारित कामाचा लवकरच शुभारंभ होणार आहे. म्हणजेच सव्वा दोन कोटी रुपये खर्च होणार आहे. तरीही काम रखडले आहे.
तब्बल दोन लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या सातपूरला एक बसस्थानक नाही. सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीत रोजगारासाठी आलेल्या परजिल्ह्यातील नागरिकांना गावी जाण्यासाठी सीबीएस, महामार्ग, ठक्कर बाजार बसस्थानक आदी ठिकाणी जावे लागते.
इन्फो==
सातपूरला अद्ययावत बसस्थानक व्हावे म्हणून दीड कोटी रुपयांचा आमदार निधी उपलब्ध करून दिला होता; पण काम रखडल्याने खर्च वाढला. राज्यात भाजपची सत्ता आणि भाजपचाच आमदार असताना निधी उपलब्ध करून दिला नसल्याने काम रेंगाळले आहे. विद्यमान आमदारांनी केवळ ग्रीन जीमव्यतिरिक्त काहीही काम केलेले नाही. ही या मतदारसंघाची शोकांतिका आहे.
-नितीन भोसले, माजी आमदार
इन्फो==
मागील पंचवार्षिक काळात सातपुरच्या बसस्थानकासाठी ५० लाख रुपयांचा आणि आता पुन्हा २५ लाख रुपयांचा आमदार निधी उपलब्ध करुन दिला आहे. तिसऱ्या टप्प्याच्या कामाला लवकरच सुरुवात होईल. आणि सहा महिन्यात बसस्थानकाचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.
-सीमा हिरे, आमदार