शिर्डी विमानतळ रस्त्याचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 11:15 PM2018-01-28T23:15:33+5:302018-01-29T00:05:54+5:30
जागतिक कीर्तीचे देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी ज्या पालखी रस्त्याने साईभक्त प्रवास करतात, तो शिर्डी विमानतळ रस्ता गेल्या सहा महिन्यांपासून पदयात्रेकरूंसाठी डोकेदुखीचा ठरत आहे. सिन्नर तालुक्यातील वावी ते शिर्डी विमानतळ या सुमारे १६ किलोमीटर रस्त्याचे काम गेल्या तीन महिन्यांपासून बंद असल्याने या रस्त्याने पायी चालण्यासह व वाहने चालविणे जिकिरीचे झाले आहे. रस्त्याचे काम बंद असताना सार्वजनिक बांधकाम खात्याने ‘सबुरी’चे धोरण स्वीकारल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शैलेश कर्पे ।
सिन्नर : जागतिक कीर्तीचे देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी ज्या पालखी रस्त्याने साईभक्त प्रवास करतात, तो शिर्डी विमानतळ रस्ता गेल्या सहा महिन्यांपासून पदयात्रेकरूंसाठी डोकेदुखीचा ठरत आहे. सिन्नर तालुक्यातील वावी ते शिर्डी विमानतळ या सुमारे १६ किलोमीटर रस्त्याचे काम गेल्या तीन महिन्यांपासून बंद असल्याने या रस्त्याने पायी चालण्यासह व वाहने चालविणे जिकिरीचे झाले आहे. रस्त्याचे काम बंद असताना सार्वजनिक बांधकाम खात्याने ‘सबुरी’चे धोरण स्वीकारल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ओझर विमानतळ ते शिर्डी विमानतळ या सुमारे ७० किलोमीटर रस्त्याच्या कामास केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने गेल्या साडेतीन वर्षांपूर्वी मंजुरी दिली होती. पहिल्या टप्प्यात ओझर विमानतळ ते वावी या सुमारे ५० किलोमीटर रस्त्याचे तीन वर्षांपूर्वीच काम झाले. त्यानंतर उर्वरित वावी ते शिर्डी विमानतळ (वेस) या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते गेल्या वर्षभरापूर्वीच करण्यात आला. वावी ते सायाळे या रस्त्याचे काम अंदाजपत्रकानुसार होत नसल्याने सायाळे येथील सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे केली होती.
कार्यारंभाची तारीख तीन महिन्यांपूर्वीच
वावी ते शिर्डी विमानतळ या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते सुमारे वर्षभरापूर्वी करण्यात आला होता.
त्यानंतर दोन-तीन महिन्यात या रस्त्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला होता. रस्त्याच्या कामाची माहिती देणारा फलक रस्त्याच्या कडेला लावावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे यांनी केल्यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी या रस्त्याच्या कडेला कामाचा फलक लावण्यात आला आहे; मात्र त्यावर कामाच्या कार्यारंभ आदेशाची तारीख १७ आॅक्टोबर २०१७ दाखविण्यात आली आहे. फलक लावण्यापूर्वी दुशिंगपूर ते मलढोण फाटा या सुमारे ४ किलोमीटर रस्त्याचे काम झाले असताना कार्यरंभाची तारीख तीन महिन्यांपूर्वीची दाखविण्यात आल्याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले आहे.
शताब्दी समाधी महोत्सवामुळे पदयात्रेकरुंची संख्या वाढली
शिर्डी येथील साईबाबांच्या शताब्दी समाधी महोत्सवाचे २०१८ हे वर्ष आहे. त्यामुळे गुजरात राज्यासह मुंबई, ठाणे व उपनगरासह नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पायी दिंड्या शिर्डीला जात आहेत. सिन्नर-शिर्डी रस्त्यावर वावी येथे आल्यानंतर दुशिंगपूर, सायाळे, जवळके, डोºहाळे मार्गे शिर्डीला जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. याच मार्गाला पालखी रस्ता म्हणून संबोधले जाऊ लागले आहे. जवळचा मार्ग असल्याने अनेक दिंड्या महामार्ग सोडून या रस्त्याने पायी शिर्डीला जात असतात. त्यामुळेच या रस्त्याला पालखी मार्ग असेही संबोधले जाऊ लागले आहे. या रस्त्यावर शिर्डी विमानतळ असल्याने या रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाली आहे. यावर्षी महिन्याभरात या रस्त्याने हजारो पदयात्रेकरू शिर्डीला गेले आहे; मात्र रस्त्याचे काम रखडलेले असल्याने साईभक्तांचा प्रवास खडतर झाला आहे.