‘स्मार्ट रोड’चे काम पुढील सप्ताहात सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:17 AM2018-05-24T00:17:04+5:302018-05-24T00:17:04+5:30
स्मार्ट सिटी अभियानांतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका या १.१ किमी मार्गाचे स्मार्ट रोडमध्ये रुपांतर करण्यात येणार असून, सदर कामास पुढील सप्ताहात सुरुवात होणार असल्याची माहिती नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी दिली आहे.
नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका या १.१ किमी मार्गाचे स्मार्ट रोडमध्ये रुपांतर करण्यात येणार असून, सदर कामास पुढील सप्ताहात सुरुवात होणार असल्याची माहिती नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी दिली आहे. दरम्यान, सदर मार्गावरील वाहतूक वळविण्यासाठी पोलीस आयुक्तालयाला पत्र देण्यात आले आहे. स्मार्ट सिटी अभियानांतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका हा स्मार्ट रोड करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी १६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सदर स्मार्ट रोडसाठी कंपनीमार्फत दोन ते तीनवेळा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती; परंतु, प्रतिसाद मिळाला नव्हता. आता निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कंत्राटदार निश्चित झाला असून, स्मार्ट रोडच्या कामास प्रत्यक्षात पुढील सप्ताहापासून सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी सुरुवातीला शासकीय कन्या शाळा, बिटको कॉलेज, हुतात्मा स्मारक, प्रिया हॉटेल, जिल्हा बॅँकेचे जुने कार्यालय ते मोडक सिग्नलपर्यंतच्या एका बाजूचे काम सुरू करण्यात येणार आहे. सदर रस्ता हा अतिशय वर्दळीचा असल्याने काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक अन्य मार्गाने वळवावी लागणार आहे. स्मार्ट सिटी कंपनीने पोलीस आयुक्तांशी पत्रव्यवहार केला असून, चर्चाही झाल्याची माहिती थविल यांनी दिली. स्मार्ट रोडचे काम करताना दुतर्फा साडेसात मीटरचा रस्ता होणार आहे. त्यात काही ठिकाणी रस्त्याची रुंदी कमी असल्याने नियम २१० अंतर्गत जागेचे संपादन करावे लागणार आहे. परंतु, या नियमानुसार करावयाच्या कार्यवाहीस विलंब लागणार असल्याने तूर्त रस्त्याचे काम करण्यात येणार आहे.