कंत्राटी कामगारांचे प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 02:02 AM2018-02-17T02:02:59+5:302018-02-17T02:03:15+5:30
प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयातील कंत्राटी कामगारांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी गुरुवारपासून कार्यालयाबाहेर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
नाशिकरोड : प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयातील कंत्राटी कामगारांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी गुरुवारपासून कार्यालयाबाहेर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयातील ग्रामीण रस्ते विकास कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, २०१२ पासून ग्रामसडक योजना कार्यालयातील कंत्राटी कामगारांना पगारवाढ झालेली नाही. गडचिरोली येथील रूपेश दिघोरे व धुळे जिल्ह्यातील अभिजित पाटील यांचा कामावर असताना अपघाती मृत्यू झाला; मात्र त्यांना शासनाने कुठलीही मदत केली नाही. मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्या या मागणीसाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयातील कंत्राटी कामगारांनी गुरुवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनामध्ये संघटनेचे अध्यक्ष विकास डेकाटे, संदीप पाटील, जितेश भामरे, ताराचंद डोंगरे, जितेंद्र खैरनार, धनराज मोंढे, किरण जाधव, गोपाळकृष्ण चव्हाण, गणेश खरोटे, नीलेश पाटील, भिवराज वाघ, किरण सानप, सुहास घोडके, अविनाश सुर्वे, स्वप्निल वाघ, संतोष भावसार, श्याम काळे, पुरुषोत्तम सावकारे आदी सहभागी झाले आहेत.
समान काम समान वेतन देण्यात यावे, कर्मचाºयांचा अपघात विमा उतरविण्यात यावा, वैद्यकीय व प्रसूती रजा देण्यात यावी, प्रवास भत्ता देण्यात यावा, इतर कंत्राटी कामगारांच्या तुलनेत आम्हाला मिळणारे वेतन ५० टक्के कमी आहे, इतर ठिकाणच्या कंत्राटी कामगारांना वर्षाअखेर पाच टक्के वेतनवाढ मिळते, आम्हाला मात्र पगारवाढच झालेली नाही.