देवळा व चांदवड तालुक्यांतील तलाठ्यांचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:12 AM2021-07-15T04:12:11+5:302021-07-15T04:12:11+5:30
निवेदनात म्हटले आहे, तालुक्यातील उमराणा सजेचे तलाठी एस.एस. पवार यांना दि. २५ जून रोजी निलंबित करण्यात आले ...
निवेदनात म्हटले आहे, तालुक्यातील उमराणा सजेचे तलाठी एस.एस. पवार यांना दि. २५ जून रोजी निलंबित करण्यात आले होते. सदरचे निलंबन हे अन्यायकारक असून हे निलंबन मागे घेण्यात यावे, अशी मागणी देवळा तलाठी संघाने तहसीलदार देवळा तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानंतर देवळा व चांदवड तालुक्यांतील तलाठी व मंडल अधिकारी यांनी दि. ६ ते ९ जुलै या कालावधीत काळी फीत लावून कामकाज करत सदर निलंबनाचा निषेध केला होता. परंतु, सदरचे निलंबन मागे घेण्यात आले नाही. यामुळे नाइलाजास्तव दि. १२ जुलै रोजी देवळा व चांदवड तालुक्यांतील सर्व तलाठी व मंडल अधिकारी यांनी आपल्या डिजिटल स्वाक्ष-या तहसील कार्यालयात जमा करून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. हे अन्यायकारक निलंबन मागे घेतले नाही, तर १९ जुलैपासून जिल्ह्यातील सर्व तलाठी व मंडल अधिकारी हे बेमुदत कामबंद आंदोलन छेडणार असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक यावर प्रतिबंधात्मक कारवाई न केल्याचा ठपका ठेवत चांदवडचे उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांनी उमराणा सजेचे तलाठी एस.एस. पवार यांना निलंबित करण्याचा आदेश काढला होता.