तारवालानगर ते गुंजाळबाबा रस्त्याचे काम सुरू
By admin | Published: May 17, 2014 11:52 PM2014-05-17T23:52:24+5:302014-05-18T00:33:44+5:30
प्रभाग ३ : वाहतुकीचा प्रश्न सुटणार
प्रभाग ३ : वाहतुकीचा प्रश्न सुटणार
पंचवटी : दिंडोरीरोडवरील तारवालानगर ते हिरावाडीतील गुंजाळबाबा नगर रस्त्याच्या रुंदीकरण कामाला प्रशासनाकडून सुरूवात करण्यात आली आहे. येत्या काही महिन्यात या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात येणार असुन अमृतधाम ते तारवालानगर असा १०० फूट रस्ता तयार झाल्यानंतर हिरावाडीतील मुख्य रस्त्यावरच्या वाहतुकीचा प्रश्न काहीसा मार्गी लागणार आहे.
तारवालानगर ते गुंजाळबाबा नगर व पुढे शिवकृपानगर ते अमृतधाम असा शंभर फूट रस्ता तयार करण्यात येणार आहे. काही महिन्यांपुर्वीच या रस्ता रुंदीकरणाचे उदघाटन करण्यात आले होते. सदरच्या रस्त्याचे काम झाल्यानंतर हा रस्ता अमृतधाम ते थेट दिंडोरीरोडला जोडला जाणार असल्याने हिरावाडीतून चालणार्या अवजड वाहतुकीला काहीसा लगाम बसणार आहे. तारवालानगर येथे रस्ता रुंदीकरणासाठी रस्त्याच्या मध्यभागी असलेले काटेरी झाडे, गाजरगवत काढून रस्ता समांतर करण्यात आला आहे. तर रेशिमबंध लॉन्स समोर रस्त्यावर मार्किंग करून नवीन रस्ता तयार करण्यासाठी खोदकाम केलेले आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळयाच्या दृष्टीने प्रशासनाकडून या रस्त्याचे काम केले जात आहे. (वार्ताहर)