दहावा मैलवरील बोगद्याचे काम बंद पाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 06:15 PM2019-06-12T18:15:23+5:302019-06-12T18:16:02+5:30
स्थानिक नागरिक आक्रमक : उड्डाणपूल उभारण्याची मागणी
वरखेडा : राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ३ वरील दहावा मैल येथे बोगद्या ऐवजी उड्डाणपुलाची मागणी करत स्थानिक नागरिकांनी बोगद्याचे काम बंद पाडले. दहावा मैल विमानतळ रस्ता अजूनही प्रतीक्षेतच आहे. विमानतळावर सध्या रहदारीचे प्रमाण वाढले असून गुजरातला जाणारा हा जवळचा मार्ग असल्याने वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच जानोरी परिसरातील औद्योगिक वसाहतीतील अवजड वाहने देखील याच मार्गाने जात असून येथे बोगद्या ऐवजी उड्डाणपूल करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सदर रस्ता गुजरात - शिर्डीला जोडणारा जवळचा रस्ता असुन वणी- सप्तशृंगी देवीभक्तांसाठीही हा सोयीस्कर मार्ग आहे. रोजची रहदारी मोठ्या प्रमाणात असुन अवजड वाहनांचीही वर्दळ वाढत चालली आहे. कार्गो तसेच जानोरी येथील औद्योगिक वसाहतीतुन मोठमोठे कंटेनर तसेच अवजड वाहने ये-जा करतात. परंतु साधारण बोगद्यातून ते निघणे जिकिरीचे होईल. तसेच पुढे शिर्डीकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने त्याबाजुनेही वाहने ये-जा करतात. त्यामुळे वाहनांना अंदाज येवू न शकल्याने अपघाताचे प्रमाण अधिक वाढेल. यासाठी याठिकाणी उड्डाणपूलाची आवश्यकता असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. दहावा मैल ते नाशिक एअरपोर्ट रस्त्याचे काम पुर्ण न झाल्यामुळे रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. वाहने चालवताना रस्त्यावरील खड्डे चुकविताना होणारे लहान मोठे अपघात नित्याचेच झाले आहे. शेतकरी व प्रशासन यांच्यात जमिन हस्तांतरित करण्याचा मुद्दा अजुन प्रलंबितच असल्याकारणास्तव रस्ताही प्रतिक्षेतच आहे. या रस्त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने लवकरात लवकर शेतकरी व प्रशासनामधील जमिन हस्तांतरित विषयावर तोडगा काढावा व रस्ता दुहेरी व चांगल्या प्रतीचा बनवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.