प्रभागांतील कामांना गती प्राप्त होणार
By admin | Published: February 3, 2015 01:40 AM2015-02-03T01:40:52+5:302015-02-03T01:41:19+5:30
प्रभागांतील कामांना गती प्राप्त होणार
नाशिक : महापालिकेच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे तुंबलेल्या विकासकामांची कोंडी आता हळूहळू मोकळी होणार असून, प्रशासनाने नगरसेवक निधीतून करावयाच्या अत्यावश्यक कामांचा प्राधान्यक्रम ठरवत एकदाची हंडी फोडल्याने प्रभागांतील कामांना गती प्राप्त होणार आहे. त्याचा शुभारंभ पालिकेतील बांधकाम विभागाने करत तीस लाखांच्या आतील विविध कामांच्या ई-निविदा काढल्या आहेत. विकासकामांबाबत प्रशासन जागचे हलल्याने गेल्या काही महिन्यांपासून नगरसेवक आणि प्रशासन यांच्यात निर्माण झालेल्या संघर्षाची धार काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या दोन-अडीच वर्षांपासून सिंहस्थ कामांच्या नावाखाली प्रभागातील विकासकामे रखडल्याची ओरड नगरसेवकांकडून सातत्याने होत आलेली आहे. महापालिकेला आठ महिने आयुक्त नव्हते त्यावेळी पालिकेचे कामकाज जवळपास ठप्पच झाले होते. नोव्हेंबरमध्ये डॉ. प्रवीण गेडाम यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर विकासकामे मार्गी लागण्याच्या शक्यतेने नगरसेवकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. परंतु आयुक्तांनी महापालिकेच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे नगरसेवक निधीत कपात करत तो २० लाखांवर आणला; शिवाय नगरसेवकांच्या कामांच्या फाईली परत माघारी पाठविल्याने नगरसेवकांमध्ये तीव्र असंतोष उफाळून आला होता. महासभेतही त्याचे पडसाद उमटल्यानंतर महापौरांनी अखेर ५० लाखांच्या निधीवर शिक्कामोर्तब केले होते. तरीही कामे पुढे सरकत नसल्याने नगरसेवकांमध्ये खदखद सुरूच होती. त्याची ठिणगी नगरसेवक लक्ष्मण जायभावे आणि आयुक्त यांच्यात झालेल्या खडाजंगीने उडाली. त्याचेही पडसाद उमटले. दरम्यान, आयुक्तांनी आता नगरसेवक निधीतील कामांना हिरवा कंदील दाखविला असून, खातेप्रमुखांकडून मागविलेल्या याद्यांमधील कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्यावर भर दिला जात आहे. प्रामख्याने एकाच विभागाची कामे न घेता कामांचा समतोल राखला जाणार आहे. नगरसेवक निधीतून करावयाच्या विकासकामांची हंडी फोडण्याचे काम सर्वप्रथम बांधकाम विभागाने केले आहे. बांधकाम विभागाने सामाजिक सभागृहाचे विस्तारीकरण, महिलांसाठी कम्युनिटी सेंटर, सभामंडपाला संरक्षक भिंत, समाजमंदिर, खुल्या जागेत अभ्यासिका व व्यायामशाळा, डॉ. आंबेडकर पुतळ्याच्या सभामंडपाचे सुशोभिकरण, गटारींची दुरुस्ती व कॉँक्रिटीकरण, अंतर्गत रस्ते डांबरीकरण, पेव्हरब्लॉक बसविणे, सार्वजनिक स्वच्छतागृह व शौचालये आदि कामांच्या ई-निविदा काढल्या आहेत. दीर्घ कालावधीनंतर सिंहस्थ कामांव्यतिरिक्त प्रभागांतील तुंबलेल्या विकासकामांच्याही फाईली निघाल्याने नगरसेवकांना दिलासा लाभला असून, प्रशासनानेही नगरसेवकांकडून कामांचा प्राधान्यक्रम मागविला आहे. (प्रतिनिधी)