गणेशोत्सवासाठी वॉटरप्रूफ मंडपाचे काम वेगात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 01:50 AM2019-08-26T01:50:23+5:302019-08-26T01:50:43+5:30
सुखकर्त्या विघ्नहर्त्या लाडक्या गणरायाच्या आगमनाची पंचवटी परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तयारी सुरू केली असून, गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मंडप उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
पंचवटी : सुखकर्त्या विघ्नहर्त्या लाडक्या गणरायाच्या आगमनाची पंचवटी परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तयारी सुरू केली असून, गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मंडप उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. गणेश प्रतिष्ठापणेला अवघ्या आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिला असून, त्यादृष्टीने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कामाचा वेग वाढविला आहे. गणेशोत्सव कालावधीत वरुणराजा बरसण्याची शक्यता असल्याने अनेक मंडळांनी यंदाच्या वर्षी वॉटरप्रूफ मंडप उभारणीला प्राधान्य दिले आहे.
येत्या दि. २ सप्टेंबर रोजी गणेशाची प्रतिष्ठापना केली जाणार असून, लाडक्या गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी पंचवटी परिसरातील अनेक छोट्या मोठ्या मित्रमंडळाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली आहे. शनिवारी सकाळी अनेक मंडळांनी मंडप उभारणीच्या कामाचे श्रीफळ वाढविले.
मंडळाच्या कार्यकर्त्यांची मेहनत वाया जाऊ नये तसेच देखावे पाण्याने भिजू नयेत यासाठी यंदाच्या वर्षीदेखील वॉटरप्रूफ मंडप उभारणीला पसंती दिली आहे, असे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
गणेशोत्सव कालावधीत पावसाची शक्यता असल्याने ऐन उत्सवात पावसाचे विघ्न येऊ नये यासाठी मंडप उभारणी करताना लोखंडी पत्रे, प्लॅस्टिक बारदानचा आधार घेत मंडप उभारणीचे काम हाती घेण्यात आलेले आहे. पावसाळ्यात मंडप गळून गणेशोत्सव देखावे भिजण्याची शक्यता आहे.