श्रमदानातून केले तळवाडे भामेर कालव्याचे काम
By admin | Published: February 20, 2017 11:15 PM2017-02-20T23:15:57+5:302017-02-20T23:16:19+5:30
पाणीटंचाई : वीस वर्षांपासून सुरू आहे पोहोच कालव्याचे काम
जायखेडा : बागलाण तालुक्यातील पिंपळकोठे व परिसरातील गावांना संभाव्य पाणीटंचाईची चाहूल लागू लागली असून, फेब्रुवारीनंतर सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागणार असून, ही बाब लक्षात घेऊन हरणबारी धरणाच्या डावा कालवा ते काठगड बंधारा व तळवाडे भामेर पोहोच कालव्याद्वारे तुंगाडी नदीपर्यंत पाणी सोडून दिलासा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. संबंधित विभाग तांत्रिक कारण देत दुर्लक्ष करीत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या भागातील विहिरींची पाणी पातळी खालावल्याने आत्तापासूनच पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. या कालव्याद्वारे पाणी सोडल्यास विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. अन्यथा पाण्याअभावी उभी पिकं सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. यासाठी तातडीने पाणी सोडण्याची मागणी होत आहे.
वीस वर्षांपूर्वी प्रशासकीय मान्यता मिळालेल्या तळवाडे भामेर पोहोच कालव्याचे काम कासव गतीने सुरू आहे. या कालव्यामुळे जवळपास दहा हजार हेक्टरहून अधिक शेतजमीन ओलिताखाली येण्याची अपेक्षा आहे. मात्र शेतकरी केवळ प्रतीक्षा करीत आहेत. कालव्याचे १ ते १० किलोमीटरचे काम या आधीच पूर्ण झाले आहे. मात्र दरम्यान काही शेतकऱ्यांनी कालव्याच्या कामास विरोध केल्याने काम बरीच वर्ष बंद होते. दरम्यान, कालव्याच्या सेवा तसेच निरीक्षण पथावरील भराव शेतकऱ्यांनी नांगरून टाकल्याने व भरावाची उंची संकलित उंचीपेक्षा कमी झाल्याने पाणी सोडल्यास हे पाणी भरावाच्या वरून जाऊन आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ शकते. यामुळे कालव्याच्या ४ ते ५ किलोमीटर दरम्यानचा भराव केल्याशिवाय पाणी सोडणे शक्य नसल्याचे कारण पाटबंधारे विभागाकडून देण्यात येत होते. भरावाचे काम पूर्ण करून पाणी सोडावे यासाठी शेतकऱ्यांनी अनेक दिवस सर्वस्थरावर प्रयत्न केले मात्र त्यास यश आले नाही. अखेर शासनाची वाट न पाहता पिंपळकोठे, भडाणे, तांदूळवाडी व लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी लोकवर्गणी, श्रमदानाने द्वारकधीश साखर कारखान्याच्या मदतीने भराव करून या कालव्याची दुरुस्ती करून घेतली आहे. आता हरणबारी धरण ते कठगड बंधारा व पुढे तुंगाडी नदीपर्यंत पाणी साडावे, अशी मागणी करण्यात येत आहे.(वार्ताहर)