येवल्यात कामगार शिक्षण कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 05:21 PM2020-12-25T17:21:58+5:302020-12-25T17:22:10+5:30
सक्षम महिला सशक्त भारताची गरज : पवार
येवला : दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण व विकास बोर्ड, श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार प्रादेशिक संचनालय नाशिक व भाजपा बूनकर प्रकोष्ट यांच्यावतीने येमको बँकेच्या डॉ. हेडगेवार सभागृहात दोन दिवसीय कामगार शिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.
शिक्षण कार्यक्रमात प्रथम सत्रात आर्थिक सहायता केंद्र नाशिक जिल्हा अधिकारी श्रीमती सुनंदा सोनवणे यांनी बँक प्रणाली बाबत, महिला सबलीकरण फाउंडेशनच्या श्रीमती स्मिताताई जोशी यांनी महिला साक्षरता या विषयावर तर श्रम व रोजगार मंत्रालयाच्या प्रादेशिक संचालिका श्रीमती सारिका डाफरे यांनी महिला सबलीकरण व कामगार कायदे यासंदर्भात मार्गदर्शन केले. दुसर्या दिवसातील सत्रात जळगाव पीपल्स बँक बचत गट विभाग प्रमुख श्रीमती शुभांगी दप्तरे यांनी महिला बचत गटांच्या बाबत, मनोज दिवटे यांनी महिला उद्योजिका व यशोगाथा याबाबत तर ल्युका इंडस्ट्रीजच्या श्रीमती माधुरी पाटील यांनी कामगार क्षेत्रातील समस्या व उपाय याबाबत मार्गदर्शन केले. यशदा पुणे व आय.आर.डी. मास्टर रिसोर्स पर्सन, प्रमुख बंडोपंत ठेंगडी कामगार शिक्षा बोर्डच्या श्रीमती अनिता वाघ यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचा समारोप दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांचे उपस्थितीत झाला. याप्रसंगी खासदार पवार यांनी, महिलांनी संघटित होऊन काम करण्याची गरज असल्याचे सांगत जास्तीत जास्त महिलांनी नवीन व्यवसायात योग्य प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे, असे आवाहन केले. प्रास्ताविक व सूत्रसंचलन संयोजक मनोज दिवटे यांनी केले. कार्यक्रमास येमकोचे चेअरमन अरुण काळे, जेष्ठ संचालक धनंजय कुलकर्णी, व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, डॉ. उमेश काळे, भाजपा शहराध्यक्ष तरंग गुजराथी, पंकज पहिलवान, विशाल काथवटे, बापू गाडेकर आदी उपस्थित होते.