कामगार, शेतकरी आर्थिक विषमतेत भरडतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:16 AM2021-05-18T04:16:25+5:302021-05-18T04:16:25+5:30
नाशिक : या देशात आर्थिक विषमता वाढत असून कामगार, शेतकरी त्यात भरडला जातोय. म्हणून समन्यायी समाज निर्माण व्हावा, असा ...
नाशिक : या देशात आर्थिक विषमता वाढत असून कामगार, शेतकरी त्यात भरडला जातोय. म्हणून समन्यायी समाज निर्माण व्हावा, असा आशावाद कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांनी व्यक्त केला.
नाशिकच्या कामगार क्षेत्रात सिटूच्या माध्यमातून कार्यरत असलेले डॉ. कराड डिजिटल वसंत व्याख्यानमालेत बोलत होते. लक्ष्मणराव तांबे स्मृती व्याख्यानात डॉ. कराड यांनी सतरावे पुष्प 'कामगार-नोकरदारांपुढील आव्हाने' या विषयावर गुंफले.
एकेकाळी कामगार चळवळीतील नेतृत्वाला समाजमान्यता होती. पण दोन दशकांपासून ही भावना बदलून गेली. मालकाच्या दडपशाहीखाली असलेल्या कामगारांच्या हक्कासाठी संघर्षाची भूमिका घ्यावी लागल्याचे मत डॉ. कराड यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना डॉ. कराड म्हणाले, स्वातंत्र्य चळवळीत शेतकरी, कामगार आघाडीवर होता, पण सामाजिक, आर्थिक आणि मानसिक गुलामगिरी होती. ब्रिटिश आणि पोर्तुगीजांनी प्रागतिक विचार आणल्याने मूल्ये बदलत गेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्हॉईसरॉयचे सरकार आणि स्वतंत्र भारत सरकारच्या काळात मंत्री म्हणून १४ महत्त्वाचे कायदे निर्माण केले, मात्र विद्यमान सरकारने जुने कायदे रद्द करून श्रमसंहिता कायदे करून कामगार हा घटकच नष्ट केल्याची खंत डॉ. कराड यांनी व्यक्त केली.
शेतकरी आणि कामगार कायदे रद्द होत असताना विरोधकही कोषात राहिले, हे लोकशाहीचे दुभंगलेपण असून, त्याची मोठी किंमत सामान्य जनतेला द्यावी लागणार असल्याचे डॉ. कराड म्हणाले. उद्योग बंद पाडणारे लोक म्हणून टीकाही झाली, पण या संघर्षात प्रतिकार करण्याची भूमिका घेतली, म्हणून गुणवत्तापूर्ण कामगामरांची पिढी घडवू शकलो, अशा शब्दात त्यांनी चळवळीतील प्रवासाचे सिंहावलोकन केले.
यावेळी प्रसन्न तांबे, मालेच्या सहसचिव उषा तांबे उपस्थित होते. मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले, तर चिटणीस संगीता बाफना यांनी आभार मानले.