कामगारांना कंपनीतच लस द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:14 AM2021-05-09T04:14:30+5:302021-05-09T04:14:30+5:30
सातपूर : औद्योगिक वसाहतीतील कामगार मोठ्या संख्येने कोरोनाबधित होत असून, असंख्य कामगार मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे कामगारांना कंपनीच्या आवारातच ...
सातपूर : औद्योगिक वसाहतीतील कामगार मोठ्या संख्येने कोरोनाबधित होत असून, असंख्य कामगार मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे कामगारांना कंपनीच्या आवारातच कोरोनावरील लस उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रामुख्याने त्याचे उगमस्थान औद्योगिक नगरी आहे. कारखान्यांमध्ये हजारो कामगार एकत्रितपणे काम करतात. शेकडोंच्या संख्येने कामगार कोरोनाबाधित होत आहेत. अनेक कामगारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आरोग्य सेवा कोलमडून पडल्याने रुग्णांवर उपचार करणे अवघड जात आहे. त्यामुळे कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. म्हणूनच कामगारांना कंपनीच्या आवारातच कोरोनावरील लस उपलब्ध करुन द्यावी. सातपूर विभागात कामगार वसाहती आणि झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने तत्काळ नियोजनबद्ध पद्धतीने सर्व नागरिकांचे लसीकरणाबाबत कार्यवाही करावी. म्हणजे भविष्यात नागरिकांना कोरोनासारख्या महाभयंकर विनाशकारी रोगापासून संरक्षण मिळेल. प्रशासनाला आदेशित करुन लसीकरण मोहीम लवकरात लवकर राबवावी, अशी मागणी पालकमंत्री छगन भुजबळ यांना दिलेल्या निवेदनाद्वारे बसपाचे बजरंग शिंदे, अरुण काळे, रवी काळे, नंदकुमार जाधव, माजी नगरसेविका सुजाता काळे, सविता काळे, ज्योती शिंदे तसेच बाळा निगळ, नीलेश भंदुरे, सुनील मौले आदींसह नागरिकांनी केली आहे.
(फोटो ०८ सातपूर) :- कामगारांना कंपनीच्या आवारातच लस देण्याच्या मागणीचे निवेदन पालकमंत्री छगन भुजबळ यांना बसपाचे बजरंग शिंदे यांनी दिले. यावेळी अरुण काळे, नंदकुमार जाधव, आदी उपस्थित होते.