माठ तयार करण्यासाठी कारागिरांची लगबग सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 05:55 PM2019-01-24T17:55:27+5:302019-01-24T17:56:04+5:30
संक्र ांती सणानंतर उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात होते. तशी माठातील गार पाणी पिऊन तहान कशी भागेल याची चाहूल सर्वांनाच लागलेली असते.त्यासाठी येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील कुंभार योगेश रसाळ यांनी आतापासूनच हस्तकलेद्वारे मातीचे माठ तयार करण्यास सुरु वात केली आहे.
फेब्रुवारी महिन्यात सुरू होणारी कुंभार बांधवांची कामे यंदा जानेवारी महिन्याच्या अखेरला सुरू झाली आहेत. उन्हाळ्यात हंडा वा पंचपात्रीमधील पाण्याने तहान भागणे शक्य नसते. त्यामुळे मातीपासून बनविलेल्या माठातील पाणी कसे आणि कोठे मिळेल याचा शोध नागरिक घेत असतात. यंदा पाऊस समाधानकारक झाला नसल्याने उन्हाची अधिक जाणवणार असल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन योगेश रसाळ यांनी माठ बनविण्यास यंदा लवकर सुरुवात केली आहे. गावात पारंपरिक पद्धतीनुसार मातीची भांडी बनवली जातात. बाजारात कच्चा मालाचे दर सातत्याने वाढत असल्याने कुंभार बांधवांना मातीपासून भांडी तयार करणे अवघड झाले आहे. व्यवसाय कसा करायचा, असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे.
पिढ्यानपिढ्या चालत आलेला व्यवसाय सुरू ठेवायचा म्हणून नफ्या-तोट्याचा विचार न करता मोठ्या प्रमाणात खर्च करूनही तो वसूल होतो की नाही याची कोणतीच शाश्वती नसल्याने दिवसेंदिवस कुंभार व्यवसाय धोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. यंदाची दुष्काळाची दाहकता लक्षात घेता भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. बऱ्याच ठिकाणी पुढच्या काही दिवसात पाणी मिळेल की नाही याचीही शाश्वती नसतानाही माठ बनविण्यासाठी कुंभार बांधवांची लगबग सुरू झाली आहे.