जिल्हा बॅँकेच्या दोन्ही शाखांत चालणार कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 06:55 PM2019-07-08T18:55:31+5:302019-07-08T18:56:03+5:30
शहरातील मध्यवर्ती भागात जुना आग्रारोडवर जिल्हा बॅँकेची जुनी इमारत असताना तत्कालीन अध्यक्ष माणिकराव कोकाटे यांच्या कारकिर्दीत द्वारका येथे बारा कोटी रुपये खर्च करून नवीन इमारत उभारली. या इमारतीत बॅँकेचे संपूर्ण संगणकीकरण करण्याबरोबरच अद्ययावत सुविधा निर्माण करण्यात आल्या.
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : आर्थिक दृष्टचक्रात सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या द्वारका येथील मुख्यालयातील काही विभागांचे जुना आग्रारोडवरील बॅँकेच्या जुन्या इमारतीत स्थलांतर करण्यात आले असून, सोमवारपासून प्रत्यक्षात कामकाजालाही सुरुवात झाली आहे. बारा कोटी रुपये खर्च करून अद्ययावत बांधलेल्या नवीन इमारतीतून पुन्हा जुन्या इमारतीतून कामकाज करण्याच्या बॅँकेच्या या निर्णयाबद्दल उलटसुलट चर्चा होत असून, अंधश्रद्धेला बळी पडूनच बॅँकेच्या पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
शहरातील मध्यवर्ती भागात जुना आग्रारोडवर जिल्हा बॅँकेची जुनी इमारत असताना तत्कालीन अध्यक्ष माणिकराव कोकाटे यांच्या कारकिर्दीत द्वारका येथे बारा कोटी रुपये खर्च करून नवीन इमारत उभारली. या इमारतीत बॅँकेचे संपूर्ण संगणकीकरण करण्याबरोबरच अद्ययावत सुविधा निर्माण करण्यात आल्या. गेल्या काही वर्षांपासून या ठिकणाहून बॅँकेचे सर्व कामकाज केले जात असून, काही वार्षिक सर्वसाधारण सभादेखील घेण्यात आल्या आहेत. जुनी इमारत मात्र तशीच पडून असून, बॅँकेने एम्प्लायमेंट एक्सचेंज विभागाला तसेच अण्णासाहेब महामंडळाला भाडेतत्त्वावर काही जागा दिली होती. तथापि, नाबार्डने बॅँकेच्या या कृतीवर हरकत घेऊन बॅँकेची मालमत्ता भाड्याने देता येत नसल्याचे म्हटले. नवीन इमारतीत बॅँकेचा कारभार चालत असतानाच, काही प्रकरणांमध्ये बॅँकेच्या संचालकांची चौकशी करण्यात येऊन त्यांचे संचालकपदही रद्दची कारवाई करण्यात आली, त्याचबरोबर बॅँकेवर प्रशासकही नेमण्यात आले. नोटाबंदी व अन्य कारणांमुळे जिल्हा बॅँकेची आर्थिक परिस्थिती खालावली, अशा एक नव्हे अनेक कारणांनी बॅँक अडचणीत आल्याने बॅँकेच्या वास्तुत दोष असल्याची व त्यामुळे बॅँकेचे पुन्हा जुन्या इमारतीतच स्थलांतर करण्याची चर्चा सुरू झाली. अशातच बॅँकेने अक्षय तृतीयेच्या दिवशी जुन्या इमारतीत सत्यनारायण पूजा केल्यामुळे या चर्चेला उधाण आले. अखेर रविवारी बॅँकेच्या सुटीच्या दिवशी नवीन इमारतीतून फर्निचर, टेबल, खुर्च्या, संगणक आदी साहित्य पुन्हा जुन्या इमारतीत आणण्यात येऊन सोमवारी कामकाजाला सुरुवात करण्यात आली. या संदर्भात बॅँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बॅँकेच्या स्थलांतरास दुजोरा दिला असला तरी, नवीन इमारतीतूनही कामकाज चालणार असल्याचे सांगितले. जुन्या इमारतीच्या देखभाल दुरुस्तीवर बॅँकेला खर्च करावा लागत होता. त्यामुळे या वास्तुचा पुन्हा उपयोग करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आहेर म्हणाले.