कळसूबाई शिखरावर रोपवेसाठी कृतिशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 05:03 PM2019-12-26T17:03:42+5:302019-12-26T17:04:02+5:30
छगन भुजबळ : शिष्टमंडळाला भेटीत दिले आश्वासन
घोटी : राज्यातील सर्वोच्च असलेले कळसूबाई शिखर पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असल्याने शिखरावर महत्वाकांक्षी रोप वे योजनेच्या मंजुरीसाठी सरकार दरबारी कृतिशील असल्याचा शब्द राज्याचे कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ यांनी कळसुबाई मित्र मंडळाच्या शिष्टमंडळाला दिला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे आणि गिर्यारोहकांनी भुजबळ यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
रोप वे योजनेमुळे स्थानिक ग्रामस्थांना रोजगार, पर्यटन समृद्धी यासह इगतपुरी, अकोले तालुक्याच्या विकासात भर पडणार आहे. गत शासनामध्ये मंत्री असतांना भुजबळ यांनी कळसुबाई शिखरावर रोप वे योजना साकारण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र नंतर हा विषय रखडला होता. आता ह्या प्रकरणी संबंधित खात्याकडून समीक्षा करून निर्णय घेतला जाणार असून यामुळे कळसुबाई शिखर रोप वे योजनेमुळे विकासाचा अनुशेष भरून निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता नव्या सरकारमध्ये भुजबळ हे महत्वपूर्ण मंत्री असल्याने रोप वे योजना साकारण्याबाबत अपेक्षा वाढल्या आहेत. घोटी येथील कळसुबाई मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा गिर्यारोहक भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली समता परिषदेचे तालुकाध्यक्ष शिवा काळे, शाहीर बाळासाहेब भगत, अशोक हेमके, बाळा आरोटे, प्रवीण भटाटे आदींनी यासंदर्भात भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी रोप वे योजनेबाबत स्मरण असून योजना मंजुर करण्यासाठी कृतीशीलतेने योग्य तो निर्णय घेऊ असा शब्द भुजबळ यांनी दिला. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनीही चर्चेत भाग घेऊन रोप वे योजनेला सहकार्य करणार असल्याचे सांगितले.