मोडणारे संसार पोलिसांमुळे जुळले

By Admin | Published: March 8, 2017 12:19 AM2017-03-08T00:19:40+5:302017-03-08T00:19:58+5:30

नाशिक : शहर व ग्रामीण पोलीस दलातील महिला सुरक्षा विशेष शाखेने गत वर्षभरात ३५५ मोडकळीस आलेल्या संसारांना जोडण्याचे कठीण काम केले आहे़

The world that breaks is bound by the police | मोडणारे संसार पोलिसांमुळे जुळले

मोडणारे संसार पोलिसांमुळे जुळले

googlenewsNext

विजय मोरे : नाशिक
सासू-सासऱ्यांसोबत पटत नाही म्हणून पूर्वी घरात भांडणे होत असत. मात्र, आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे नवरा-बायकोमध्ये भांडणे होत आहेत. नोकरदार नवरा-बायकोत तर हे प्रमाण अधिक जाणवतेय... चहा-नाष्टा तुझे तू करून घे, मीही तुझ्यासारखीच नोकरी करते, मीही पैसे कमावते, इथपासून तर घरी येण्यास उशीर का, संशयावरून एकमेकांच्या मोबाइलमधील मेसेज, सोशल मीडियावरील कॉमेंट्स तपासणे या गोष्टीही संसार मोडकळीला येण्यास कारणीभूत ठरत आहेत. या संसारांना टिकविण्यासाठी महत्त्वाचा आधार म्हणजे दोघांचेही समुपदेशऩ नाशिक शहर व ग्रामीण पोलीस दलातील महिला सुरक्षा विशेष शाखेने गत वर्षभरात ३५५ मोडकळीस आलेल्या संसारांना जोडण्याचे कठीण काम केले आहे़  प्रेमविवाह असो की ठरवून केलेला विवाह असो संसारातील भांडण हा अविभाज्य घटक आहे़ नवरा-बायकोपैकी कुणाच्या एकाचा अहंकार, गैरसमजूत, क्षुल्लक, किरकोळ वाद वेळीच न शमल्याने तो घटस्फोटापर्यंतही पोहोचल्याची अनेक उदाहरणे आहेत़ याचे प्रमुख कारण म्हणजे या दोघांपैकी एकही जण माघार घेण्यासाठी तयार नसतो़ त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या लहान मुलांची मात्र ससेहोलपट होते़ भांडणाचा परिणाम त्या कोवळ्या मुलांवर होत असतो, याची जाणीव त्या दोघांनाही नसते आणि असलीच तरी ती करून घ्यायची नसते. नातेवाईक, मित्रमंडळी आपापल्या परीने यात लक्ष घालून सल्ले देण्याचे काम करत असतात. मात्र तरीही काही फरक पडत नसल्याने शेवटी पोलीस ठाण्याची पायरी दोघेही चढतात. महिलांवरील अत्याचारासाठी शहर तसेच ग्रामीण पोलीस मुख्यालयात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंतर्गत महिला सुरक्षा विशेष कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या दोन्ही कक्षांकडे गत वर्षभरात १ हजार २५२ तक्रारी आल्या. या तक्रारींची दखल घेऊन तक्रारदार नवरा-बायकोचे समुपदेशन करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम या विशेष कक्षाने केले. यासाठी येथे कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी आपापल्या परीने समुपदेशन करतात. त्यात त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळत असल्याचे दिसून येते.  जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०१६ या वर्षभराच्या कालावधीत आलेल्या तक्रार अर्जांपैकी शहर महिला शाखेस १८७, तर ग्रामीण पोलीस महिला शाखेला १६८ असे एकूण ३५५ अर्ज समुपदेशनाच्या माध्यमातून निकाली काढण्यात यश आले. उर्वरित अर्जांमध्ये तडजोड न झाल्याने नाइलाजाने गुन्हे नोंदविण्याची वेळ आली आहे. या शाखेकडे येणारे अर्ज हे प्रामुख्याने महिलांवरील अत्याचाराचे असतात. तर काही प्रकरणांमध्ये महिलांकडूनही पुरुषांना त्रास होत असल्याचे दिसून येते. अनेकदा एकाच बैठकीत प्रश्न सुटले नाहीत, तरी दोन-तीन बैठकांमध्ये प्रश्न सोडवले जातात.
अनेक प्रकरणांमध्ये पती-पत्नी दोघेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतात. अशावेळी कक्षातील महिलांचे प्रयत्न कमी पडले, तर अन्वेषण शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने समुपदेशन केले जाते. आपसात तडजोड केली नाही, तर नाइलाजाने गुन्हा दाखल करावा लागेल आणि एकदा गुन्हा दाखल झाला, तर अनेक अडचणी निर्माण होतील, या भीतीपोटी अनेकांनी आपले संसार जुळवून घेतल्याची माहिती महिला विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे़

Web Title: The world that breaks is bound by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.