जागतिक वन दिन विशेष! नाशिकच्या राखीव जंगलांना सर्रास लावला जातोय ‘सुरुंग’

By अझहर शेख | Published: March 21, 2023 04:54 PM2023-03-21T16:54:54+5:302023-03-21T16:55:17+5:30

वन संरक्षणाचे मोठे आव्हान, जिल्ह्यात एकेकाळी घनदाट जंगले अस्तित्वात होती; दंडकारण्य म्हणून नाशिक ओळखले जात होते; मात्र काळाच्या ओघात नाशिककरांनी हे सर्व गमावून टाकले आहे,  

World Forest Day Special! The reserved forest lands of Nashik city and district are under threat day by day | जागतिक वन दिन विशेष! नाशिकच्या राखीव जंगलांना सर्रास लावला जातोय ‘सुरुंग’

जागतिक वन दिन विशेष! नाशिकच्या राखीव जंगलांना सर्रास लावला जातोय ‘सुरुंग’

googlenewsNext

नाशिक - शहरासह जिल्ह्यातील राखीव वनांच्या जमिनी दिवसेंदिवस धोक्यात येत आहेत. उघड्या दिसणाऱ्या वनजमिनींवर वाढते अतिक्रमण आणि वनजमिनींचा गैरव्यवहार मागील काही दिवसांपासून चर्चेत आले आहे. नांदगाव, पांझण आणि मालेगावमध्ये वनजमिनींवर सोलरचे मोठे प्रकल्प उभे राहिल्याचा धक्कादायक प्रकार वनखात्याने काही आठवड्यांपूर्वी उघडकीस आणला होता. यामुळे ‘जागतिक वन दिन’ दरवर्षी २१ मार्च रोजी साजरा केला जात असला तरी हा दिवस केवळ कागदोपत्रीच उरला आहे की काय? अशी शंका उपस्थित होत आहे.

जिल्ह्यात एकेकाळी घनदाट जंगले अस्तित्वात होती; दंडकारण्य म्हणून नाशिक ओळखले जात होते; मात्र काळाच्या ओघात नाशिककरांनी हे सर्व गमावून टाकले आहे, हे फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या अहवालातूनही गेल्या वर्षी स्पष्ट झाले आहे. नाशिकच्या वनांचे घटते प्रमाण व अहवालातील टक्केवारी चिंताजनक असली तरी वन संरक्षणाबाबत प्रशासनासह लोकप्रतिनिधींमध्येही गांभीर्य दिसून येत नसल्याची खंत निसर्गप्रेमी व पर्यावरणप्रेमींनी वन दिनाच्या पूर्वसंध्येला बोलून दाखविली. नाशिकच्या सभोवतालपासून महामार्गांचा विकास केला जात आहे. समृद्धी व नाशिक सुरत ग्रीन फिल्ड महामार्गांसारख्या प्रकल्पामुळे वनांचा ऱ्हास अटळ आहे. वनजमिनीही अधिग्रहीत केल्या जात आहे. यामुळे वनांचे अस्तित्व धोक्यात सापडले आहे.

वनांची अवस्था ‘दीन’

जिल्ह्यातील पूर्व भागातील नांदगाव, मालेगावसारख्या तालुक्यांसह त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्येही काही राखीव वनांच्या जागेवर व्यावसायिकांकडून अतिक्रमण करण्यात आल्याचे समोर आले. एकूणच वनजमिनींना चोहोबाजूंनी सुरुंग लावला जात असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे वनांची अवस्था ‘दीन’ झाली असून, त्याचा परिणाम पर्यावरणासह हवामानावरही होताना दिसत आहे. परिणामी, नागरिकांनाही बदलत्या हवामानाचा सामना करावा लागत असून, अवकाळी पावसाचे अस्मानी संकटदेखील त्याचाच एक भाग असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

‘रिसॉर्ट ट्रेंड’ ठरतोय घातक

नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सुरगाणा, दिंडोरी यांसारख्या तालुक्यांमध्ये मागील काही वर्षांपासून ‘रिसॉर्ट ट्रेंड’ वेगाने फोफावत चालले आहे. निसर्गाचा समतोल राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे; मात्र या ट्रेंडमुळे या जबाबदारीचा कुठेतरी विसर पडल्याचे दिसते. ‘सेकेंड होम’ संकल्पनेनुसार फार्म हाऊस असो किंवा ‘रिसॉर्ट’चा व्यवसाय करताना स्थानिक जैवविविधता नैसर्गिक परिसंस्थेला धक्का लागणार नाही, यासाठी कोणीही खबरदारी घेताना दिसत नाही. यामुळे तेथील वनांसह जलस्त्रोत, वृक्षसंपदेचा ऱ्हास वाढत चालला आहे.

बिबट्याचे वाढले हल्ले!

वनांचा होणाऱ्या ऱ्हासामुळे बिबट्यासारख्या वन्यप्राणी सैरभैर होत असून अलीकडे त्र्यंबकेश्वर तालुक्यात बिबट्याचे मानवी हल्ले वाढल्याचे दिसून येत आहे. बिबट्या, तरस, कोल्हे, लांडगे आदी वन्यप्राण्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष वाढू लागल्याने त्याचा धोका मानवालाही होताना दिसत आहे. मानवाने त्यांच्या घरात चालविलेला हस्तक्षेप वन्यप्राण्यांना लोकवस्तीकडे येण्यास प्रवृत्त करत असल्याचे वन्यजीवप्रेमी संघटनांचे म्हणणे आहे.

...आता जंगल उरले अवघे ६ टक्के!

१) जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र- १५,५३० किमी.
२) वनाच्छादनाचे क्षेत्र- ६.९५ टक्के

३) घनदाट जंगल - ०.०० टक्के
४) मध्यम वनाच्छादन- ३४६ किमी

५) खुरटे (खुले) वन क्षेत्र- ७३३ किमी
(वन सर्वे ऑफ इंडिया रिपोर्ट : २०२१)
 

Web Title: World Forest Day Special! The reserved forest lands of Nashik city and district are under threat day by day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल