नाशिकच्या सात विद्यार्थ्यांचा जागतिक विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:32 AM2018-12-24T00:32:28+5:302018-12-24T00:33:07+5:30
इस्तंबूल (तुर्की) येथे मेमोरियाड मेंटल मॅथ आणि मेमरी फेडरेशन आयोजित तुर्की ओपन चॅम्पियनशिप २०१८ स्पर्धेमध्ये नाशिकच्या सात विद्यार्थ्यांनी जागतिक विक्रम करीत १५ पदके मिळवून नाशिकचे नाव जगाच्या नकाशावर कोरले आहे
सातपूर : इस्तंबूल (तुर्की) येथे मेमोरियाड मेंटल मॅथ आणि मेमरी फेडरेशन आयोजित तुर्की ओपन चॅम्पियनशिप २०१८ स्पर्धेमध्ये नाशिकच्या सात विद्यार्थ्यांनी जागतिक विक्रम करीत १५ पदके मिळवून नाशिकचे नाव जगाच्या नकाशावर कोरले आहे. भारतीय जिनिअस किड संघाने ओपन व किड्स प्रकारात ४१ मेडल्स व १५ सुवर्णपदके मिळवून ही स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत भारतातून जिनिअस किड्सच्या वेगवेगळ्या शाखांमधून ४१ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेमध्ये नाशिकमधील जिनिअस किड-व्हिज किड, गंगापूररोड अकॅडमीचे ७ विद्यार्थी सहभागी झाले होते. मास्टर आर्यन शुक्ल (अशोका युनिव्हर्सल स्कूल, अर्जुननगर), गार्गी जोशी (अशोका युनिव्हर्सल स्कूल, वडाळा) व अरुंधती पताडे (होरायझन अकॅडमी) या मुलांनी मिळून २ जागतिक विक्रम तसेच ८ सुवर्णपदके व १५ पदकेमिळवून उच्चांक प्रस्थापित केला आहे. तनुश्री जगताप (अशोका युनिव्हर्सल स्कूल, अर्जुननगर) रोहिणी शिरडकर व दुर्वा माळी (रचना विद्यालय), समृद्धी शेवाळे (न्यू मराठा हायस्कूल) या स्पर्धकांनी त्यांनी भाग घेतलेल्या स्पर्धेमध्ये पहिल्या १० मध्ये येऊन विशेष मानांकन प्राप्त केले आहे. जिनिअस किड-व्हिज किड अकादमीचे नितीन जगताप, वैशाली जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. आर्यन शुक्लने या स्पर्धेमध्ये दोन वर्ल्ड रेकॉर्ड सहित ७ सुवर्णपदके आणि १० मेडल्स मिळवून नवा जागतिक उच्चांक प्रस्थापित केला आहे.