जागतिक रेडक्रॉस दिन : ‘नाशिक रेडक्रॉस’ने दोन तपापासून जोपासलाय लसीकरणाचा वसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 05:29 PM2018-05-07T17:29:09+5:302018-05-07T17:29:09+5:30

नवजात बालक व त्यांच्या मातांना वेळोवेळी लसीकरण दिल्यास विविध आजारांपासून प्रतिबंध होऊ शकतो आणि ते सुदृढ निरामय राहू शकतात, ही बाब लक्षात घेऊन इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या नाशिक शाखेने मागील दोन तपांपासून लसीकरणाचे व्रत यशस्वीपणे स्वीकारले आहे.

World Red Cross Day: 'Nashik Red Cross' vaccine's fat from two checks | जागतिक रेडक्रॉस दिन : ‘नाशिक रेडक्रॉस’ने दोन तपापासून जोपासलाय लसीकरणाचा वसा

जागतिक रेडक्रॉस दिन : ‘नाशिक रेडक्रॉस’ने दोन तपापासून जोपासलाय लसीकरणाचा वसा

Next
ठळक मुद्दे वैद्यकीय व्यवसायाच्या स्पर्धेत रेडक्रॉसची आरोग्यसेवा सरकारी योजनांतर्गत बहुतांश आजारांना प्रतिबंध घालणारे लसीकरण मोफत

नाशिक : रोगप्रतिकारक शक्ती विकसित होईपर्यंत नवजात बालकांना विविध आजारांचा धोका असतो. त्यामुळे माता-बालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. नवजात बालक व त्यांच्या मातांना वेळोवेळी लसीकरण दिल्यास विविध आजारांपासून प्रतिबंध होऊ शकतो आणि ते सुदृढ निरामय राहू शकतात, ही बाब लक्षात घेऊन इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या नाशिक शाखेने मागील दोन तपांपासून लसीकरणाचे व्रत यशस्वीपणे स्वीकारले आहे.
मानवजातीची सेवा या उद्देशाने इंडियन रेडक्रॉस सोसायटीची शहरामधील शाखा कार्यरत आहे. माता, बालकांसह महिला, वृद्ध व तारुण्यात पदार्पण करणाऱ्या युवतींना आवश्यक ते सर्व लसीकरण या शाखेमार्फत पुरविले जाते. सरकारी योजनांतर्गत बहुतांश आजारांना प्रतिबंध घालणारे लसीकरण या शाखेतून मोफत उपलब्ध केले जातात. महिलांच्या आजारांशी संबंधित लसीकरणही रेडक्रॉसमधून केले जाते. शनिवार हा लसीकरणाचा दिवस रेडक्रॉसने निश्चित केला आहे. लसीकरणासाठी माता-बालक उपक्रमात डॉ. प्रतिभा औंधकर व बालरोग तज्ज्ञ डॉ. नितीन बिर्ला सेवा देत आहेत. केवळ शहरामधील नव्हे तर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून माता-बालक लसीकरणासाठी दर शनिवारी रविवार कारंजा येथील रेडक्रॉसच्या दवाखान्यात हजेरी लावतात. एकूणच जिल्हाभरातील रुग्णांची सेवा रेडक्रॉसकडून केली जात आहे. केवळ लसीकरणापुरते मर्यादित न राहता इंडियन रेडक्रॉस सोसायटीने काळानुरूप वैद्यकीय सेवेच्या दिशेने पुढचे पाऊल टाकत आरोग्यसेवेचे व्रत जोपासले आहे. केवळ प्रथमोपचारापुरतेच मर्यादित न राहता नाममात्र दरात फिजिओथेरपी, दंतचिकित्सा, नेत्रचिकित्सा उपचार पद्धतीही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना त्याचा अधिक फायदा होत आहे.

वैद्यकीय व्यवसायाच्या स्पर्धेत रेडक्रॉसची आरोग्यसेवा

स्पर्धेच्या युगात वैद्यकीय व्यवसायामध्येही तीव्र स्पर्धा वाढीस लागल्याचे चित्र आहे. यामुळे दंत व नेत्रचिकित्सा आणि उपचार पद्धतीदेखील महागली असून, सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला दंत व नेत्राच्या आजाराबाबत उपचार करून घेणे शक्य होत नाही. सदर बाब लक्षात घेऊन दोन वर्षांपूर्वी रेडक्रॉसच्या नाशिक शाखेने नाममात्र दरात फिजिओथेरपी केंद्रासह दंत व नेत्रचिकित्सा केंद्रही सुरू केले आहे. दररोज सकाळी दहा ते दुपारी एक वाजेच्या दरम्यान या केंद्रांवर शेकडो गरीब रुग्ण उपचार घेताना दिसून येतात. सामाजिक बांधिलकीमधून वैद्यकीय सेवेचे व्रत स्वीकारणा-या रेडक्रॉस सोसायटीने काळानुरूप आपल्या कार्यप्रणालीमध्ये बदल करत नावीन्यपूर्ण आरोग्यसेवेचा ध्यास कायम ठेवला आहे.

Web Title: World Red Cross Day: 'Nashik Red Cross' vaccine's fat from two checks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.