‘वर्ल्ड स्पाईन डे’ : आपल्या मणक्यावर आपण प्रेम करायला शिकले पाहिजे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:41 PM2018-10-16T12:41:23+5:302018-10-16T12:47:26+5:30

पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी, खांदेदुखीकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञांकडून त्याची तपासणी करुन घेणे गरजेचे असते. आपण या जागतिक मणकेविकार दिनी एक संकल्प करुया आणि आपल्या मणक्यांवर प्रेम करुया...!

 'World Spine Day': We must learn to love our heart! | ‘वर्ल्ड स्पाईन डे’ : आपल्या मणक्यावर आपण प्रेम करायला शिकले पाहिजे !

‘वर्ल्ड स्पाईन डे’ : आपल्या मणक्यावर आपण प्रेम करायला शिकले पाहिजे !

Next
ठळक मुद्देसातत्याने जनजागृतीवर भर दिला जात आहे. जगभरात १६ आॅक्टोबर हा दिवस ‘वर्ल्ड स्पाईन डे’ म्हणून साजरा केला जातो‘आपली पाठ ताठ ठेवा’

आज जागतिक मणकेविकार दिन. यावर्षीची थीम ‘लव्ह युअर स्पाईन’ म्हणजेच आपण आपल्या पाठीचे संरक्षण केले पाहिजे व प्रेमाने काळजीपूर्वक त्याचा वापर केला पाहिजे. थोडक्यात आपल्या मणक्यावर आपण प्रेम करायला शिकले पाहिजे.
हा दिवस साजरा करण्यास सर्वप्रथम २०१२साली सुरुवात झाली. जगभरात १६ आॅक्टोबर हा दिवस ‘वर्ल्ड स्पाईन डे’ म्हणून साजरा केला जातो. २०१२ साली ‘आपली पाठ ताठ ठेवा’ या घोषवाक्याने प्रारंभ करण्यात आला होता. मागील वर्षी ‘युअर बॅक इन अ‍ॅक्शन’ अर्थात पाठीला आपल्या दैनंदिन कामांसोबतच व्यायाम, नृत्य, खेळ, ट्रेकिंग, पोहणे अशा विविध गोष्टींमध्ये समाविष्ट करुन घेणे.


अमेरिकेत दरवर्षी १० कोटी कामाचे दिवस वाया जात आहेत. उपचारांवर करोडे रुपये खर्च केले जात आहेत.  पाठदुखीची ही अवस्था आहे, तर आपल्या भारतासारख्या लोकसंख्येच्या तुलनेत मोठा असलेल्या देशात ही समस्या किती गंभीर होऊ शकते? याची आपण कल्पनाही करु शकत नाही. भारतात हे प्रमाण दहापटीने अधिक आहे.
प्रसारमाध्यमे, जाहिराती, बातम्या, सोशल मिडियाच्या माध्यमातून याबाबत सातत्याने जनजागृतीवर भर दिला जात आहे. कारण आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी जनजागृतीच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाच्या ठरतात. स्पर्धेच्या या युगात धावत असताना आपण आपल्या शरिराकडे आणि त्याच्या महत्त्वाच्या अवयवांकडे दुर्लक्ष करत आहोत, याची पुसटशी कल्पनाही नागरिकांच्या मनात येत नाही. जेव्हा असह्य पाठदुखी, कंबरदुखी सारखे आजार जडतात तेव्हा आपण मरगळ झटकतो आणि जागे होतो, तोपर्यंत आपण पाठीचा मणक्याचा कणा कसा ताठ राहिल व त्यादृष्टीने आपली जीवनशैली, आहारपध्दती कशी असायला हवी, याबाबत सतर्कता दाखवत नाही.
शस्त्रक्रिया कुणालाही आवडत नाही, परंतू अत्यावश्यक असणाऱ्या मणक्याच्या शस्त्रक्रियेबाबत केवळ अज्ञान किंवा कमी महितीच्या आधारे मनात भीती दाटलेली असते. त्यामुळे रुग्ण याकडे दुर्लक्ष करणे पसंत करतात आणि अंगावर दुखणे काढतात. यामुळे आजार कमी होण्याऐवजी अधिकाधिक बळावतो. मोजका औषधोपचार, योग्य विश्रांती, व्यायाम मान, पाठीची काळजी, मणक्यांची नैसर्गिक रचना टिकविण्यासाठी नियमितरित्या सजग सावध राहून व्यायामाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. केवळ दहा ते वीस टक्के रुग्णांना पाठदुखीमध्ये शस्त्रक्रियेची गरज भासते. मणक्यांच्या संरक्षणासाठी पाठीचे स्नायू बळकट करण्याचा प्रयत्न करावा.


आपण आपल्या पाठीला समतोल ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पाठीच्या मणक्याचा मनोरा कमकुवत होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. कुठल्याही व्यायामात व दैनंदिन कृतीत पाठीचे वळण, मानेचे वळण, कंबरेचे व खुब्यांचा समतोल राखला तर पाठीला नक्कीच कमी इजा होऊ शकते.
आजार जडल्यावर उपचार करण्यापेक्षा आजार जडणार नाही, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केलेल्या नेहमीच चांगल्या असतात. पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी, खांदेदुखीकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञांकडून त्याची तपासणी करुन घेणे गरजेचे असते. आपण या जागतिक मणकेविकार दिनी एक संकल्प करुया आणि आपल्या मणक्यांवर प्रेम करुया...!

- डॉ. मुकेश अग्रवाल, मणकेविकार तज्ज्ञ, नाशिक

Web Title:  'World Spine Day': We must learn to love our heart!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.