विश्व जलशांती यात्रा काढणार
By admin | Published: July 1, 2015 01:34 AM2015-07-01T01:34:59+5:302015-07-01T01:41:46+5:30
विश्व जलशांती यात्रा काढणार
नाशिक : जगाला पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी, जलसाक्षरतेचा जागर करण्यासाठी प्रख्यात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह हे उद्यापासून (दि. १) विश्व जलशांती यात्रा काढणार असून, तब्बल पाच वर्षे चालणाऱ्या या यात्रेचा प्रारंभ नाशकातून होणार आहे. डॉ. सिंह उद्या नाशकात वृक्षारोपण करून यात्रेसाठी जर्मनीकडे रवाना होणार आहेत.जलसंकटामुळे ओसाड झालेल्या राजस्थानमधील काही गावांत हिरवाई फुलवणाऱ्या डॉ. सिंह यांनी हाच वसा जगाला देण्यासाठी या विश्वयात्रेचे आयोजन केले आहे. यासंदर्भात डॉ. सिंह म्हणाले, जेथे पाणी असते, तेथे सुख-समृद्धी वास करते. त्यामुळे जगामध्ये जलसाक्षरता वाढवण्याची गरज आहे. त्यातून जलयुद्धाऐवजी जलशांती निर्माण होऊ शकेल. या पार्श्वभूमीवर आपण पुढील पाच वर्षे जगभरात भ्रमंती करणार असून, पहिला दौरा जर्मनीचा केला जाईल. तेथील दहा-बारा शहरांना भेटी दिल्यानंतर आपण भारतात परत येऊ. त्यानंतर इंग्लंडचे राजपुत्र प्रिन्स चार्ल्स यांच्या आमंत्रणावरून इंग्लंडच्या दौऱ्यावर जाऊ. तेथे थेम्स नदीला आलेल्या पुरासाठी आपल्या सूचनांनुसार उपाययोजना सुरू आहेत.
या दौऱ्यात त्यांची पाहणी केली जाईल. त्यानंतर स्टॉकहोम, स्वीडन अशा अनेक देशांचे दौरे करून तेथील लोकांना नद्यांचे महत्त्व पटवून देणार आहोत. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या यात्रेला नाशकातून प्रारंभ करीत आहोत. नीर, नदी व नारी यांचा सन्मान हा कुंभमेळ्याचा मूळ उद्देश होता; मात्र कालौघात तो हरवला. येत्या कुंभमेळ्यात लोकांना हा खरा अर्थ पटवून देण्याची चांगली संधी आहे. ‘ग्रीन कुंभ’ या संकल्पनेची मुहूर्तमेढ नाशकातून करून देशापुढे आदर्श निर्माण करण्याची गरज आहे, असेही डॉ. सिंह म्हणाले.