पारंपरिक मतदारांची अपेक्षित साथ न मिळाल्याने आघाडीत चिंता; युतीत मात्र वाढली स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 01:04 AM2019-05-25T01:04:57+5:302019-05-25T01:05:12+5:30
विशिष्ट भागाची आणि विशिष्ट समुदायाची गठ्ठा मते गृहीत धरणे हे नेहेमीच धोक्याचे ठरू शकते. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत हा मध्य नाशिक मतदारसंघात कॉँग्रेस-राष्टÑवादीला आलेला अनुभव यंदाही कायम राहिला आहे.
विशिष्ट भागाची आणि विशिष्ट समुदायाची गठ्ठा मते गृहीत धरणे हे नेहेमीच धोक्याचे ठरू शकते. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत हा मध्य नाशिक मतदारसंघात कॉँग्रेस-राष्टÑवादीला आलेला अनुभव यंदाही कायम राहिला आहे. या मतदारसंघात युतीने मांडलेली मुसंडी बघता पारंपरिक मतदार हेदेखील बदलाच्या कौलाच्या दिशेनेच जात असल्याचे स्पष्ट होत असून, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यादृष्टीने वाटचाल केले तरच युतीला आव्हान देणे विरोधकांना शक्य होणार आहे.
२००९ मध्ये विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना केल्यानंतर मध्य नाशिक मतदारसंघ तयार झाला. यातील पूर्व भागातील गावठाण आणि दलित-मुस्लीम समाजाची गठ्ठा मते ही नेहेमीच धर्मनिरपेक्ष पक्षांच्या दृष्टीने सोयीने मानली गेली आहेत. त्यामुळे मध्य नाशिक विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी कॉँग्रेस-राष्टÑवादीची नेहमीच तयारी असते. परंतु सलग दुसऱ्या लोकसभेतदेखील मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघ महाआघाडीला वाटतो तितका सोयीचा नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात ३ लाख १५ हजार ९४७ पैकी १ लाख ७६ हजार ७८० म्हणजे ५५.९५ टक्के मतदान झाले होते. मतमोजणीत युतीचे हेमंत गोडसे यांना ९४ हजार ४२९, तर आघाडीचे समीर भुजबळ यांना ५६ हजार ४५९ मते मिळाली. त्या तुलनेत पवन पवार यांना १५ हजार ४०५ मते मिळाली. म्हणजेच महाआघाडीला या मतदारसंघातून मताधिक्य मिळालेले नाही. त्यामुळे हादेखील महाआघाडीच्या दृष्टीने सूचक इशाराच मानला पाहिजे. गावठाण, टाकळी, वडाळा यासह अन्य भागांतील दलित अल्पसंख्याकांची मते आपल्यालाच मिळतील असे गेल्या दोन विधानसभा निवडणुकीपासून आघाडी दावा करीत आली आहे. परंतु प्रत्यक्षात दोन्ही वेळचे दावे फोल ठरले आहेत.
भाजपाला सेनेची वाढणार डोकेदुखी
मध्य नाशिक मतदारसंघात दलित अल्पसंख्याकांच्या मतामुळेच भाजपाला हा मतदारसंघ सोयीचा नाही असे मानले गेले, परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीत प्रा. देवयानी फरांदे यांनी या मतदारसंघात विजय मिळवला. लाटेवर स्वार होणारा शहरी मतदार ही आजवरच्या दोन विधानसभा निवडणुकीची खासियत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी निवडणुकीसाठी या मतदारसंघातून विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांना पक्षातून आव्हान देणारे अनेक नेते आहेत. यात प्रामुख्याने माजी आमदार वसंत गिते यांच्यासह अन्य इच्छुकांची नावे घेतली जात आहे. पक्षाच्या वतीने सर्वे करून उमेदवारी दिली जात असली तरी शिवसेनेकडूनही दावेदारी केली जात आहे. त्यामुळे भाजपाची डोकेदुखी वाढणार आहे.