सोमवारनंतर पुन्हा लसीचा तुटवडा भासण्याची चिंता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:15 AM2021-03-21T04:15:13+5:302021-03-21T04:15:13+5:30

नाशिक : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना काही केंद्रांवर लस संपुष्टात येऊन नागरिकांना परत जावे लागण्याचे प्रकार गत ...

Worry about vaccine shortage again after Monday! | सोमवारनंतर पुन्हा लसीचा तुटवडा भासण्याची चिंता !

सोमवारनंतर पुन्हा लसीचा तुटवडा भासण्याची चिंता !

Next

नाशिक : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना काही केंद्रांवर लस संपुष्टात येऊन नागरिकांना परत जावे लागण्याचे प्रकार गत आठवडाभरात दोन वेळा झाले. मात्र, शनिवारी (दि. २०) पुन्हा १५ हजार लसींचा डोस दाखल झाल्यामुळे लसीकरण सुरळीतपणे पार पडले. मात्र, हा स्टॉक पुन्हा सोमवारअखेरपर्यंत संपुष्टात येण्याची शक्यता असल्याने मंगळवारपासून लसींचा तुटवडा पुन्हा भासण्याची चिंता मनपा प्रशासनाला पडली आहे.

लस घेणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत असताना लसींचा पुरवठा कमी पडण्याचे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना ताटकळत बसणे किंवा लसीकरण केंद्रावरून परत जाण्याची वेळ आली. तर, काही केंद्रांवर कोरोना लसींचा तुटवडा जाणवू लागल्याने नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वादावादीचे प्रसंगदेखील घडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाला आतापासूनच लसींचा स्टाॅक पुन्हा कधी मिळणार, अशी चिंता आतापासूनच सतावू लागली आहे. नाशिक मनपा क्षेत्रातील दवाखान्यांमध्ये केल्या जाणाऱ्या लसीकरणामध्ये दिवसाला किमान सात ते आठ हजार इतके लसीकरण होत आहे. अशा परिस्थितीत शनिवारी मिळालेला लसींचा स्टॉक हा सोमवारपर्यंतच कसाबसा पुरणार आहे. मात्र, त्यानंतरचा स्टॉक कधी मिळणार, याबाबत शनिवार सायंकाळपर्यंत आरोग्य विभागाकडून कोणतीही माहिती मिळालेली नसल्याने मनपाच्या आरोग्य विभागाला त्याच चिंतेने घेरले आहे. कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत असताना कोरोना लसीकरणाचे डोस वाढवले जाणे आवश्यक आहे. नाशिक महापालिकेने आरोग्य विभागाकडे तब्बल दीड लाख लसींची मागणी नोंदवली आहे. मात्र, लसींच्या पुरवठ्यातच हेळसांड होत असल्याने तसेच पुढील स्टॉक कधी येणार, त्याचीच निश्चिती नसल्याने मनपा प्रशासनासमोरदेखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Worry about vaccine shortage again after Monday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.