चंद्रग्रहणातही करता येईल वटपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 09:47 PM2020-06-03T21:47:25+5:302020-06-04T00:44:44+5:30
नाशिक: येत्या शुक्रवारी (दि.५) ज्येष्ठ पौर्णिमेला छायाकल्प चंद्रग्रहण असले तरी हे ग्रहण नेहमीच्या ग्रहणाप्रमाणे नसल्याने त्या दिवशी सुहासिनींना वटपूजन करता येणार असल्याचे पंचांगकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.
नाशिक: येत्या शुक्रवारी (दि.५) ज्येष्ठ पौर्णिमेला छायाकल्प चंद्रग्रहण असले तरी हे ग्रहण नेहमीच्या ग्रहणाप्रमाणे नसल्याने त्या दिवशी सुहासिनींना वटपूजन करता येणार असल्याचे पंचांगकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.
शुक्रवारी मांद्य छायाकल्प चंद्रग्रहण असून, त्याच दिवशी वटपौर्णिमा आहे. ग्रहण काळात वटपूजन करावे किंवा याबाबत महिलावर्गात संभ्रम आहे. त्या पार्श्वभूमीवर दाते पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनी याबाबत म्हटले आहे, शुक्रवारी ज्येष्ठ पौर्णिमेस चंद्रग्रहण असून, हे ग्रहण नेहमीच्या ग्रहणाप्रमाणे नसून ते छायाकल्प ग्रहण आहे. त्यामुळे या ग्रहणाचे वेध व इतर कोणतेही नियम कोणीही पाळू नयेत. नेहमीप्रमाणे सर्व व्यवहार, पूजाअर्चा, कुळधर्म, कुळाचार पार पाडता येतील.
दरम्यान, यंदा वटपूजनावर ग्रहणाचा कोणताही परिणाम होणार नसला तरी कोरोनाचे सावट मात्र कायम आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने यापूर्वी घोषित केलेल्या लॉकडाउनमध्ये शिथिलता आणली असली तरी फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पाळणे बंधनकारक आहे. त्यामुळे सुहासिनींना वटपूजनावेळी फिजिकल डिस्टन्सिंग अनिवार्य असणार आहे. त्यातही सरकारने धार्मिक सण-उत्सव यासाठी एकत्र येण्यास मनाई केलेली असल्याने यंदा वटपौर्णिमेसाठी सुवासिनीही घराबाहेर पडण्याची शक्यता कमीच आहे.
कोरोनामुळे सुवासिनींनी घराबाहेर न पडता प्रत्यक्ष वटपूजना-ऐवजी यंदा वडाचे चित्र काढून घरातच पूजन करावे. शुक्रवारी माध्यान्हापर्यंत दुपारी १.३० वाजेपर्यंत कोणत्याही वेळेत घरी वटपूजन करता येईल, असेही मोहनराव दाते यांनी म्हटले आहे.
--------------------------------
पर्यावरण दिन अन् वटपूजन
शहरात रस्ता रुंदीकरणात अनेक भागातील वटवृक्ष तोडले गेले आहेत. त्यामुळे दरवर्षी सुवासिनींना वटवृक्ष शोधण्यासाठी पायपीट करावी लागत असते. त्यातही वटवृक्षांना धागे गुंडाळल्याने त्याला हानी पोहोचते, असा वृक्षप्रेमींचा दावा असल्याने वटपौर्णिमेला त्याबाबत जनजागृतीही केली जात असते. बऱ्याच विवाहिता वडाच्या फांदद्या तोडून आणत घरी वटपूजन करत असतात. त्यालाही वृक्षप्रेमींकडून हरकत घेतली जात असते. यंदा मात्र, वटपौर्णिमा आणि जागतिक पर्यावरण दिन एकाच दिवशी येत आहे. त्यात कोरोनाचे संकट असल्याने बव्हंशी सुवासिनींकडून घरच्या घरीच वटपूजन केले जाण्याची शक्यता आहे. परिणामी, यंदा खºया अर्थाने वृक्षसंवर्धन होऊन पर्यावरण दिन साजरा होणार असल्याचे वृक्षप्रेमींकडून सांगितले जात आहे.