दीप अमावस्येनिमित्त दिव्यांचे पूजन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 01:26 AM2021-08-09T01:26:47+5:302021-08-09T01:27:50+5:30
आषाढ एकादशीपासून सात्विकतेचा काळ मानला जाणारा चातुर्मासाचा होणारा प्रारंभ, तसेच हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील दीप अमावस्येच्या निमित्ताने रविवारी रीतिपरंपरा पाळल्या जाणाऱ्या घरांमध्ये घरातील दिव्यांचे पूजन करण्यात आले, तसेच पुरणापासून बनविलेल्या दिव्यांना प्रज्वलित करुन मनोभावे पूजन करण्यात आले.
नाशिक : आषाढ एकादशीपासून सात्विकतेचा काळ मानला जाणारा चातुर्मासाचा होणारा प्रारंभ, तसेच हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील दीप अमावस्येच्या निमित्ताने रविवारी रीतिपरंपरा पाळल्या जाणाऱ्या घरांमध्ये घरातील दिव्यांचे पूजन करण्यात आले, तसेच पुरणापासून बनविलेल्या दिव्यांना प्रज्वलित करुन मनोभावे पूजन करण्यात आले.
देवघरातील अंधार दूर करणाऱ्या तेलाच्या दिव्यापासून लामण दिव्यापर्यंत, तसेच घरातील कंदिलापासून इमर्जन्सी लॅम्पपर्यंतच्या सर्व दिव्यांना हळद-कुंकू वाहून पूजन करण्याची परंपरा पाळण्यात आले. चातुर्मासातील पहिली अमावास्या म्हणून आषाढ अमावास्येला संबोधले जाते. या दिवशी पूर्वजांचे स्मरण दिवे लावण्यासह कुलदीपकाचे पूजन करून दीपदान, तसेच अन्य दान धर्म करण्याची परंपरा आहे. दिव्याची ज्योत ही अग्नितत्त्वाचे प्रतीक आहे, तर दिवा मांगल्याचे प्रतीक आहे. अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला ‘दीपपूजन’ केले जाते. आषाढ अमावास्येला ‘दीपान्वित अमावास्या’ असेही म्हणतात. पितरांच्या स्मरणार्थ या दिवशी पिंपळ, वटवृक्ष, केळी आणि तुळशीच्या रोपांची लागवड करण्याचीही प्रथा आहे. त्यामुळे पुरणाच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवून मगच कुटुंबीयांनी सहभोजन करण्याच्या प्रथेचेही पालन करण्यात आले.