शहरातील रुग्णालयांमध्ये भगवान धन्वंतरी पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 12:08 AM2020-11-14T00:08:01+5:302020-11-14T00:08:42+5:30
धनत्रयोदशीच्या दिवशी महानगरातील विविध आयुर्वेदिक औषधालये आणि रुग्णालयांमध्ये भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक रुग्णालयांमध्ये पीपीई किटसह आयुर्वेदाचे उद्गाते मानले जाणारे भगवान धन्वंतरी यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून कोरोनापासून मुक्तीची प्रार्थना करण्यात आली.
नाशिक : धनत्रयोदशीच्या दिवशी महानगरातील विविध आयुर्वेदिक औषधालये आणि रुग्णालयांमध्ये भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक रुग्णालयांमध्ये पीपीई किटसह आयुर्वेदाचे उद्गाते मानले जाणारे भगवान धन्वंतरी यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून कोरोनापासून मुक्तीची प्रार्थना करण्यात आली. पुरातन काळापासून वैद्यकीय तज्ज्ञांकडून भगवान धन्वंतरींचे साग्रसंगीत पूजन करण्याची परंपरा आहे.
आज धनत्रयोदशी दीपावलीच्या मंगलपर्वात धन्वंतरी पूजन महत्त्व असल्याने धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी पूजन केले जाते. त्याच परंपरेचे पालन नाशिकच्या आयुर्वेद सेवा संघाच्या आयुर्वेद महाविद्यालयात तसेच औषधालयात करण्यात आले. त्याशिवाय नाशिकरोडच्या बिटको रुग्णालयातही सर्व डॉक्टर्सनी पीपीई किट घालून भगवान धन्वंतरीच्या मूर्तीचे साग्रसंगीत पूजन करण्यात आले. तसेच नाशिकचे वैद्य विक्रांत जाधव यांच्या दवाखान्यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते भगवान धन्वंतरीच्या मूर्तीचे साग्रसंगीत पूजन करण्यात आले. कोविड काळात उपयुक्त ठरलेल्या सर्व वनौषधींची आकर्षक आरासदेखील यावेळी करण्यात आली होती.
इन्फो
सुवर्ण खरेदीसाठी गर्दी
धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर विविध व्यापारी आस्थापनांमध्ये तिजोरीचे पूजन करण्याच्या प्रथेचेदेखील पालन करण्यात आले. व्यापारी वर्ष दिवाळी ते दिवाळी असे मानले जाते. त्यामुळे नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशीच आणून त्यांचे पूजन करून वापरात आणल्या जातात. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन सुवर्ण विकत घेण्याचा प्रघात आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी शुक्रवारी सोने खरेदीसाठी सराफबाजारासह प्रमुख सुवर्ण पेढ्यांमध्ये जाऊन सोने खरेदी केल्याने सराफी दालनांमध्ये गर्दी होती .