पंचतत्त्वानुसार उपासना पद्धती वेगळी
By admin | Published: September 20, 2015 11:03 PM2015-09-20T23:03:21+5:302015-09-20T23:04:38+5:30
कार्ष्णी स्वामी गुरुशरणानंद : संवित स्तोत्रावलीचे प्रकाशन
नाशिक : मनुष्याचे शरीर हे पृथ्वी, आकाश, अग्नी, वायू आणि जल या पंचतत्त्वापासून बनले असून, परमेश्वरदेखील या पाच तत्त्वांनुसार स्वरूप साकार झाला आहे. ज्या शरीरात जे तत्त्व अधिक त्याप्रमाणे मनुष्य त्या देवतांची भक्ती-उपासना करतो. म्हणजे पृथ्वीतत्त्व अधिक असेल तर शिवभक्ती करतो आणि आकाशतत्त्व अधिक असेल तर विष्णूभक्ती करतो; परंतु अनेक रूपे असली तरी परमेश्वर एकच आहे, असे विचार कार्ष्णी स्वामी गुरुशरणानंद महाराज यांनी मांडले.
पंचवटीतील भक्तिधाम-कैलास मठ येथे सुरू असलेल्या रामकथेच्या समारोप व स्वामी संविदानंद सरस्वती संकलित संवित स्तोत्रावली ग्रंथाचे प्रकाशन सभारंभात महाराज बोलत होते. याप्रसंगी पुढे महाराज म्हणाले की, आपल्या सनातन हिंदू धर्मावर अनेक आरोप होतात; परंतु मन, बुद्धी, चित्त यांची एकाग्रता साधून अहंकाराचा नाश करण्याचे सामर्थ्य धर्म ग्रंथात व साधू-संतांच्या विचारात आहे. देवाचे स्वरूप अनंत आहे. परमेश्वर प्राप्तीचा खरा मार्ग जाणून घेण्यासाठी धर्मग्रंथाचे वाचन व अभ्यास व्हावा, असे सांगून त्यांनी स्वामी संविदानंद सरस्वती यांनी संकलित केलेल्या स्तोत्र ग्रंथाचे कौतुक केले.
याप्रसंगी रामकथा प्रवचनकार प्रेमभूषण महाराज, मलुकापीठाधिश्वर राजेंद्र देवाचार्य महाराज, स्वामी कैलाशानंद महाराज, स्वामी अवधेशानंद महाराज, स्वामी हरिचैतन्य महाराज आदिंनी विचार मांडले. प्रास्ताविकात स्वामी संविदानंद महाराज यांनी कैलास मठाची परंपरा तसेच, ग्रंथाच्या संकलनामागील संकल्पना स्पष्ट केली. याप्रसंगी व्यासपीठावर उपमहापौर गुरुमित बग्गा, सिद्धानंद महाराज, महेशानंद महाराज, अमित चंदजी, नरेश सभरवाल, लालचंद गुप्ता, अभयनंद महाराज आदि उपस्थित होते. यावेळी संत-महंतांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन श्याम चैतनजी यांनी केले.