बोधीवृक्ष महोत्सवासाठी नाशिकमध्ये देशभरातून उपासक येणार, शासनाकडून १८ कोटींचा निधी मंजूर
By संजय पाठक | Published: October 17, 2023 07:02 PM2023-10-17T19:02:37+5:302023-10-17T19:12:02+5:30
सुशोभीकरणासाठी मिळणार ८ कोटी रूपये
Nashik Tree Plantation संजय पाठक, नाशिक: त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारकाच्या परिसरात येत्या २४ ऑक्टोबर रोजी श्रीलंकेतील अनुराधापूर येथील बोधिवृक्षाच्या फांदीचे रोपण केले जाणार आहे. या बोधिवृक्ष स्थापना महोत्सवासाठी देश विदेशातून मान्यवर व उपासक येणार आहेत, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या महोत्सवासाठी शासनाने १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून ८ कोटी रूपये सुशोभीकरणासाठी मंजूर करण्यात आली आहे.
बोधिवृक्षाचे ऐतिहासिक महत्त्व असून सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना निरंजना नदीच्या काठावर बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले. त्यामुळे हे बोधिवृक्ष अतिपूजनीय आहे. पुढे सम्राट अशोक यांच्या मुलांनी या बोधिवृक्षाची फांदी श्रीलंकेच्या देवानामप्रिय तिरस यांच्या हस्ते अनुराधापूर येथे स्थापित केली. याच बोधिवृक्षाच्या फांदीचे रोपण नाशिक शहरात करण्यात येणार असल्याने शहराच्या ऐतिहासिक महत्त्वात भर पडणार असल्याची माहितीही भुजबळ यांनी दिली.
या महोत्सवास श्रीलंका, थायलंड, कोरिया, ब्रम्हदेश, मलेशिया, जापान, तैवान, व्हिएतनाम व कंबोडिया या देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि भन्ते व उपासक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांनाही कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे, असेही भुजबळ म्हणाले.