"रामाची पूजा करतात अन् रावणाचे राज्य करतात..."; संजय राऊत यांची टिका; अधिवेशन तयारीची घेतली माहिती
By दिनेश पाठक | Published: January 20, 2024 09:20 PM2024-01-20T21:20:09+5:302024-01-20T21:21:05+5:30
नाशिक ही रामाची भूमी आहे त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या येथील अधिवेशात आमच्या मनातील अजून काही सत्य मांडणार आहोत. काही निर्णय देखील घेतले जातील, अशी माहिती देत राऊत यांनी सस्पेन्स वाढविला.
नाशिक : केंद्र व राज्यात नतद्रष्ट नेते सत्तेत बसले आहेत. रामाची पूजा करतात आणि रावणाचे राज्य करतात ते सत्य वचनी असते तर असे वागले नसते. जनतेच्या न्यायालयातील त्यांचे मुखवटे समोर आले म्हणून त्यांचा तिळपापड झाला असल्याची टिका खासदार संजय राऊत यांनी केली. नाशिक ही रामाची भूमी आहे त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या येथील अधिवेशात आमच्या मनातील अजून काही सत्य मांडणार आहोत. काही निर्णय देखील घेतले जातील, अशी माहिती देत राऊत यांनी सस्पेन्स वाढविला.
दि.२२ रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काळाराम मंदिरात रामाची आरती, गोदाआरती व दि.२३ रोजी पक्षाचे अधिवेशन या सर्वच कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी खासदार संजय राऊत शनिवारी (दि.२०) सायंकाळी नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.नाशिकची टीम चांगली आहे. दि. २२ राेजी उद्धव ठाकरे सावरकर स्मारकला भेट देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे आले. त्यांना वीर सावरकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, दादासाहेब गायकवाड यांची आठवण झाली नाही. पण आम्हाला विस्मरण होणार नाही.
राज्य अधिवेशनाला १७०० मुख्य पदाधिकारी उपस्थित राहतील. बाळासाहेब ठाकरे यांचे नाशिककर विशेष प्रेम होते. २२ जानेवारीला अयोध्येत प्राणप्रतिषठेचा सोहळा होतोय. राम मंदिराची निर्मिती ही स्व.बाळासाहेबांची इच्छा होती. त्या लढ्यात आमचे योगदान आहे. अयोध्येतील राजकिय सोहळा भाजपाचा शेवटचा इव्हेंट सोहळा असून सुरज चव्हाण यांना अटक झाली पण प्रकरणातील खरे गुन्हेगार शिंदे गटात असल्याची टिका देखील संजय राऊत यांनी केली. उद्धव ठाकरे यांच्याशी भाजप सूडबुद्धीने वागत असून प्रभू श्रीरामही त्यांना माफ करणार नाही, असेही राऊत म्हणाले.
शिंदे गटावर साधला निशाना -
शिंदे गटाचा बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संबंध नाही पण यातील काही पात्र रामायणातील आहे, ज्यांचा रामाने वध केला होता. रामराज्य म्हणतात अन् सुडाचे राजकारण करतात, अशी बोचरी टिका देखील संजय राऊत यांनी केली.