राखीव वनात वृक्षांवर घाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:14 AM2021-04-09T04:14:52+5:302021-04-09T04:14:52+5:30
----- नाशिक : येथील वनविभागाच्या वन विकास महामंडळाच्या अखत्यारितीत असलेल्या पांडवलेणी डोंगराभोवतालच्या राखीव वनातील झाडांवर अज्ञातांकडून घाव घातला जात ...
-----
नाशिक : येथील वनविभागाच्या वन विकास महामंडळाच्या अखत्यारितीत असलेल्या पांडवलेणी डोंगराभोवतालच्या राखीव वनातील झाडांवर अज्ञातांकडून घाव घातला जात असल्याचे उघडकीस आले आहे. येथील वृक्षसंपदेला हानी पोहोचविणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
पांडवलेणी डोंगराच्या राखीव वनामध्ये वन्यजिवांचा वावर असून, त्यांचा नैसर्गिक अधिवास असून या भागात विनापरवाना प्रवेश करणेदेखील भारतीय वनअधिनियम कायद्यानुसार गुन्हा आहे. या भागात मागील पंधरवड्यापासून वृक्षांच्या मोठ्या फांद्या तोडण्यासाठी आजूबाजूंच्या झोपडपट्टी भागातील काही लोकांकडून अवैधरीत्या प्रवेश केला जात आहे. येथील ग्लिरिसिडिया प्रजातीच्या झाडांच्या फांद्या तोडून नेल्या जात असल्याचा प्रकार काही जागरूक नागरिकांच्या सतर्कतेने उघडकीस आला आहे. दरम्यान, येथील वृक्षतोड रोखण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून गस्त वाढविण्यात येत असून, संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे वनक्षेत्रपाल प्रवीण डमाळे यांनी सांगितले.
---इन्फो---
ट्रेकिंगकरिता जंगलात जाने बेकायदेशीर
पांडवलेणी डोंगराभोवती असलेल्या राखीव वनात विना परवानगी ट्रेकिंग किंवा मॉर्निंग वॉककरिता जाणे बेकायदेशीर आहे. भारतीय वन कायद्यानुसार राखीव वनात प्रवेश करणे गुन्हा ठरतो, असे डमाळे यांनी सांगितले. यामुळे आता यापुढे अशाप्रकारे जंगलात भटकंती करणाऱ्यांवरही कारवाई करण्याचा इशारा वनविकास महामंडळाच्या सूत्रांनी दिला आहे.
------इन्फो------
सुमारे ५० झाडांच्या फांद्यांवर कुऱ्हाड
या राखीव वनात अवैधरीत्या प्रवेश करत अज्ञातांकडून ग्लिरिसिडियाच्या सुमारे ५० झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात आली आहे. संबंधितांकडून झाडे पूर्णपणे न तोडता केवळ मोठ्या फांद्या कापून नेल्याचे दिसून आले आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तोडलेल्या झाडांची पाहणी करत पंचनामा केला आहे.
-----
कोट
पांडवलेणीचे जंगल नाशिकचे वैभव आहे. या जंगलातील वृक्षसंपदा सध्या धोक्यात सापडली आहे. काही लोकांकडून झाडांच्या फांद्यांवर घाव घातला जात आहे. दिवसेंदिवस हा प्रकार वाढतच चालल्याचे दिसून येत आहे.
- डॉ. मुकुंद खानापूरकर, वृक्षप्रेमी.
---
फोटो nsk वर सेंड केले आहेत.