साकोऱ्यात कुस्त्यांची दंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2022 11:33 PM2022-03-29T23:33:50+5:302022-03-29T23:38:18+5:30
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाळनाथ महाराज यात्रेनिमित्त शेवटच्या दिवशी कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात येऊन यात्रेची सांगता झाली.
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाळनाथ महाराज यात्रेनिमित्त शेवटच्या दिवशी कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात येऊन यात्रेची सांगता झाली.
कोरोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षांनंतर बाळनाथ महाराज यात्रा भरल्याने भाविकांनी चांगलीच गर्दी केली होती. मंदिराजवळ यात्रेनिमित्ताने खेळणे, पाळणे, मिठाईची दुकाने, कुल्फी गाडे, नारळाची दुकानांमुळे यात्रेची चांगलीच शोभा वाढली होती. तसेच मंदिराच्या बाजूला शाकांबरी नदीवर हाकेच्या अंतरावर बाळनाथ महाराज यांच्या बहिणीचे मंदिर बाळगोंदाणी मातेचे मंदिर असून, या मंदिरालादेखील मान देऊन यात्रा साजरी केली जाते.
नवसापोटी अनेक भाविकांनी लोटांगण घालत आपले नवस फेडले. तसेच डिजेच्या तालावर गुलालाची उधळण करण्यात आली. विशेष म्हणजे या मंदिराच्या समोर एक पाण्याचा 'डोह' असून, दुष्काळी परिस्थितीत देखील यातले पाणी कमी होत नाही. अपत्य होत नसलेल्या अनेक भाविकांनी या पाण्यात अंघोळ करून तसेच हजारो भाविकांनी रांगेत उभे राहून नतमस्तक होऊन दर्शन घेत गूळ आणि खोबऱ्याचा मलिदा अर्पण केला.
मंगळवार रोजी शेवटच्या दिवशी कुस्त्यांची दंगल होती. त्यासाठी तालुक्यातील सायगाव, पिलखोड, येवला तालुक्यातील काही गावांतील तसेच जालना येथून दोन मुलींनी या कुस्तींमध्ये सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे या मुलींनी योगाचे प्रात्यक्षिक दाखवून कुस्ती जिंकली. ३ वाजता कुस्त्यांची दंगल सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत यात्रोत्सवाची सांगता करण्यात आली.