यात्रोत्सवानिमित्त रंगली महिलांची कुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 12:14 AM2018-04-09T00:14:20+5:302018-04-09T00:14:20+5:30
औंदाणे : बागलाण तालुक्यातील जुनी मेशळी येथे पीरबाबांच्या यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांची दंगल झाली.
औंदाणे : बागलाण तालुक्यातील जुनी मेशळी येथे पीरबाबांच्या यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांची दंगल झाली. यात महिलांच्या कुस्त्या प्रमुख आकर्षण ठरल्या. कुस्त्या बघण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. मांडव टाकून दोन दिवसीय यात्रोत्सवाला प्रारंभ झाला. सायंकाळी रथ मिरवणूक काढण्यात आली. रथासमोर सादर करण्यात आलेले मोर व नंदी नृत्य मिरवणुकीचे आकर्षण ंठरले. ढोल-ताशांच्या गजरात रथ हळूहळू पुढे जात होता. युवकांनी बँडच्या तालावर ठेका धरला. रथ मिरवणुकीनंतर मौलानांच्या हस्ते पीरबाबांची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर करमणुकीसाठी लोकनाट्याचा कार्यक्रम झाला. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी कुस्त्यांची दंगल झाली. अनेक लहान मोठ्या पहिलवानांनी हजेरी लावत बक्षिसांची लयलूट केली. यावर्षी महिलांच्या कुस्त्या खेळवण्यात आल्या.