लेखणी ५५ वर्षांची झाली तरी नाही थकलेली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:18 AM2021-07-14T04:18:15+5:302021-07-14T04:18:15+5:30
नाशिक : शालेय शिक्षणापासूनच मला चांगले शिक्षक लाभले. महाविद्यालयीन काळात प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी, प्रा. वा. ल. कुलकर्णी, प्रा. ...
नाशिक : शालेय शिक्षणापासूनच मला चांगले शिक्षक लाभले. महाविद्यालयीन काळात प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी, प्रा. वा. ल. कुलकर्णी, प्रा. यु. म. पठाण, प्रा. सुधीर रसाळ हे शिक्षक लाभल्याने लिहिण्याची प्रेरणादेखील मिळाली. शालेय जीवनापासून प्रारंभ झालेल्या लेखणीला लिहायला लागून ५५ वर्षे झाली असून अद्यापही ती थकलेली नसल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले.
साहित्य क्षेत्रातील अग्रेसर सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने मंडळाच्या अठराव्या वर्धापनदिनामित्त गुगलमीट द्वारा ऑनलाइन आयोजित ‘एक तास शब्द उपासकासोबत’ या उपक्रमाचे पहिले पुष्प डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे तथा राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, प्रख्यात लेखक प्रा. डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी गुंफले.
कोत्तापल्ले यांनी त्यांचा साहित्य प्रवास उलगडताना सांगितले की, तिसरीत असताना मला वाचनाची आवड निर्माण झाली. नववीत पहिली कविता लिहिली. ‘आम्हाला परत इतिहासाकडे जावे लागेल’ हा ४० पानांचा निबंध लिहिल्याने माझ्यातील लेखक जन्माला आल्याचे डॉ. कोतापल्ले त्यांनी नमूद केले. १९७६ मध्ये माझा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. म. शोषितांच्या, वंचितांच्या, गरिबांच्या बाजूने उभा राहणारा लेखक आहे. अजून खूप अभ्यास करायचा आहे, खूप लिहायचे आहे. अजूनही म. साहित्यातील विद्यार्थी असून नवीन लिहिणाऱ्या लेखकांनी जुन्या लेखकांनी काय लिहिले आहे, हे वाचले पाहिजे, असा सल्ला देत नवीन मंडळी काय लिहीत आहे हे जुन्या लेखकांनीही वाचले पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाशिक शहराध्यक्ष सावळीराम तिदमे यांनी केले तर सूत्रसंचालन मृणाल गिते यांनी केले. मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी आभार मानले.