लिहिलेले मिळेना, डॉक्टर दुसरे स्वीकारेना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:14 AM2021-04-25T04:14:32+5:302021-04-25T04:14:32+5:30
गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोनावरील काही औषध आणि इंजेक्शन मिळणे कठीण झाले आहे. अनेक रुग्णांचे नातेवाईक यासाठी मेडिकल दुकानांत ...
गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोनावरील काही औषध आणि इंजेक्शन मिळणे कठीण झाले आहे. अनेक रुग्णांचे नातेवाईक यासाठी मेडिकल दुकानांत चकरा मारत आहेत; पण डॉक्टरांनी शिफारस केलेली औषधी मिळत नाही, यामुळे अनेक नातेवाईक हतबल झाले आहेत. जी औषधी मिळत नाही; पण त्याला पर्याय असलेली औषधी बाजारात उपलब्ध आहे, याबाबत माहिती मिळाल्यानंतर रुग्णांचे नातेवाईक याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेतात. हे औषध चालेल का ? याबाबतची विचारणा करतात. मात्र, डॉक्टरांकडून त्यास नकार मिळत असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना हताश होण्याशिवाय पर्याय उरत नाही. काही नातेवाईक तर चक्क पर्यायी औषधांची यादीच डाक्टरांना सादर करत असल्याचेही दिसून आले आहे. अर्थात ज्या औषधांचा यापूर्वी कधी वापर केलेला नाही किंवा ती वापरूनही रुग्णाला आराम पडलेला नाही, असा अनुभव असल्यानेच डॉक्टर त्यास नकार देत असल्याचे नंतर रुग्णांच्या नातेवाइकांनाही उमगते. त्यानंतर मात्र आपला नाहक होणार खर्च वाचला म्हणू ते मनाेमन डॉक्टरांना धन्यवादही देतात.