शॉर्टकटसाठी रॉंग साइड चुकीचीच; ही वेळ बचत जीवघेणी ठरू शकते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:11 AM2021-06-27T04:11:05+5:302021-06-27T04:11:05+5:30
---ही आहे रॉंग साइड---- १) जलतरण तलाव सिग्नल नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील जलतरण तलाव येथील सिग्नल जणू ‘रॉंग साइड’साठीच ...
---ही आहे रॉंग साइड----
१) जलतरण तलाव सिग्नल
नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील जलतरण तलाव येथील सिग्नल जणू ‘रॉंग साइड’साठीच ओळखला जातो की काय, अशी शंका येथील दृश्यावरून न आल्यास नवलच ! चांडक सर्कलकडून शासकीय वसाहतींच्या रस्त्याने त्र्यंबकरोडवर येणारी सर्व वाहने सर्रासपणे उजवीकडे वळण घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळ येऊन थांबतात. सातपूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा सिग्नल लाल होताच ही थांबलेली वाहने टिळकवाडी किंवा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या दिशेने जातात.
अपघातांना निमंत्रण
एका बाजूचा सिग्नल लाल असला तरी टिळकवाडीकडून येणाऱ्या वाहनांचा सिग्नल हिरवा झालेला असतो, यामुळे वाहने समोरासमोर येऊन अपघाताचा धोका संभवतो. अनेकदा लहान-मोठे अपघात घडतात.
--पोलीस पाचशे मीटर लांब---
येथे वाहतूक पोलीस थांबत नाही, तर येथून सुमारे पाचशे मीटर अंतरावर वेद मंदिराच्या कोपऱ्यावर उभे राहून ‘सावज’ शोधतात. रिक्षाचालकांकडून सर्रासपणे सिग्नलकडे कानाडोळा केला जातो. मात्र पोलीस केवळ दुचाकीस्वारांनाच ‘टार्गेट’ करतात.
२) वकीलवाडी
एमजीरोडवरून वकीलवाडीमध्ये जाण्यासाठी एकेरी प्रवेश दिला गेला आहे आणि अशोकस्तंभ, घनकर गल्लीतून वकीलवाडीकडे वाहनांना प्रवेश बंद आहे; मात्र रॉंग साइड काही वाहने या अरुंद रस्त्याने एमजी रोडच्या विरुद्ध बाजूने येतात अन् वाहतूक कोंडी होते.
--अपघातांना निमंत्रण--
या भागात व्यापारी संकुले असल्याने या अरुंद रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची पार्किंग असते. यामुळे वाहनांना धक्का लागून अपघाताच्या घटना आणि वादविवाद दररोजच होतात.
--पोलीस गायबच--
वाहतूक पोलीस कर्मचारी या परिसरात फिरकतच नाहीत. सर्रासपणे वाहतुकीचे तीनतेरा होत असतानाही वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस वकीलवाडीत अपवादानेच एखाद्या दिवशी येतात.
---
३) रविवार कारंजा
रविवार कारंजा चौकातून अशोकस्तंभाकडे तसेच रेडक्रॉस सिग्नलकडे जाण्यासाठी प्रवेश बंद आहे. हे दोन्ही रस्ते केवळ एकेरी वाहतुकीसाठी आहेत; मात्र तरीदेखील बहुतांश वाहनचालक विरुद्ध बाजूने येण्याचा प्रयत्न करतात अन् अपघातांना निमंत्रण देतात. सकाळपासून तर दुपारपर्यंत हे चित्र कायम असते.
--वाहतूक कोंडी नित्याचीच
हा चौक शहरातील अत्यंत वर्दळीचा बाजारपेठ असलेला चौक आहे. येथे सतत वाहतूक कोंडीची समस्या पहावयास मिळते. लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून सकाळपासून दुपारी १२ वाजेपर्यंत येथून वाट काढणे पादचाऱ्यांनाही मुश्कील होत आहे.
---पोलिसांची डोळेझाक--
एक वाहतूक पोलीस रेडक्रॉस सिग्नल चौकात असतो. वाहनचालक रविवार कारंजाकडून विरुद्ध बाजूने जरी आला तरी तो मध्ये रेडक्रॉस दवाखान्यापासून वळण घेतो किंवा घनकर गल्लीत वळण घेऊन पोलिसांच्या डोळ्यांत धूळ फेक करत निसटतो. रविवार कारंजा चौकात नियुक्त असलेल्या पोलिसांकडून अशा वाहनचालकांना तेथेच रोखणे गरजेचे आहे.
---पाच महिन्यांत एक लाख ८२ हजारांचा दंड---
जानेवारीपासून मेअखेरपर्यंत शहर वाहतूक शाखेने रॉंग साइड वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करत सुमारे एक लाख ८२ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. यापैकी केवळ १५ हजारांचा दंड अद्याप वसूल झाला आहे. सुमारे १८२ वाहनचालकांनी रॉंग साइड शॉर्टकट निवडल्याचे आकडेवारीवरून दिसते. मोटार वाहन कायद्यानुसार चुकीच्या बाजूने वाहन दामटविणे गुन्हा ठरतो. चुकीच्या बाजूने वाहन चालविताना दुर्दैवाने अपघात घडल्यास मोटार वाहनाचा अपघाती विम्याच्या लाभापासूनही संबंधित वाहनचालक व त्याचे वारसदार वंचित राहण्याची शक्यता निर्माण होते.
पॉइंटर्स--
शहरात पाच महिन्यांत अपघात - २०३
मृत्यू ७१/ जखमी १९३
----
===Photopath===
260621\26nsk_50_26062021_13.jpg
===Caption===
जलतरण तलाव सिग्नल