‘समाजकल्याण’च्या झेरॉक्स मशीन सापडल्या वादात
By admin | Published: June 18, 2014 11:54 PM2014-06-18T23:54:59+5:302014-06-19T00:58:01+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत‘समाजकल्याण’च्या झेरॉक्स मशीन सापडल्या वादात
नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत नुकत्याच खरेदी करण्यात आलेल्या झेरॉक्स मशीन वादात सापडल्या असून, समाजकल्याण समितीच्याच एका जिल्हा परिषद सदस्याने याबाबत उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांच्याकडे तक्रार करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
जिल्हा परिषदेच्या सेसमधून ठरावीक निधी समाजकल्याण, महिला व बालकल्याण, ग्रामीण पाणीपुरवठा या विभागांसाठी राखीव ठेवावा लागत असल्याने आणि त्यातूनच निधी कोठे खर्च करावा, अशा विवंचनेत सापडलेल्या समाजकल्याण विभागाने ही झेरॉक्स मशीनची केलेली खरेदी आता संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे मागील वार्षिक अंदाजपत्रक समाजकल्याण विभागाने बेरोजगारांना रोजगार पुरविण्यासाठी झेरॉक्स मशीन पुरविण्याचा निर्णय घेत त्यासाठी चक्क एक कोटीची तरतूद ठेवली होती. तेव्हा सर्वसाधारण सभेत सर्वच सदस्यांनी त्यास कडाडून विरोध करीत ग्रामीण भागात वीज भारनियमन असताना झेरॉक्स मशीन पुरविणे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे असल्याचे सांगितले होते. त्यावेळी झेरॉक्स मशीनचा हा एक कोटीचा निधी खर्च करण्याचे अधिकार समाजकल्याण सभापती राजेश नवाळे यांना सदस्यांनी दिले होते. प्रत्यक्षात नवाळे यांनी या एक कोटीच्या निधीतील पन्नास लाखांची तरतूद झेरॉक्स मशीन खरेदीसाठी ठेवली व त्यातूनच ही खरेदी झाल्याचे समजते. बाजारपेठेत झेरॉक्स मशीन पुरविण्यासाठी नामांकित कंपन्या त्याही वाजवी अशा ४० ते ५० हजारांच्या दरात झेरॉक्स मशीन देत असताना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने नेमका त्याउलट जास्त दराने आणि त्याही निकृष्ट मशीन खरेदी केल्याचे झेरॉक्स मशीन वितरित करताना लक्षात आल्याचे या सदस्याचे म्हणणे आहे. त्यामुळेच उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी या सदस्याने केली आहे.(प्रतिनिधी)
नायब तहसीलदारपदी पदोन्नती
नाशिक : नाशिक विभागातील तेरा अव्वल कारकून व दोन मंडल अधिकाऱ्यांना नायब तहसीलदार म्हणून विभागीय आयुक्तांनी पदोन्नती दिली असून, पदोन्नत झालेल्यांना प्राधान्याने निवडणूक, सिंहस्थ व रोहयो विभागातील रिक्त पदांवर नेमणुका द्याव्यात, असे आदेशजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पदोन्नती मिळालेल्यांमध्ये ए. जी. कोल्हे, एम. ई. मानकर, श्रीमती एम. ए. पावरा, जी. पी. कुळकर्णी, ए. आर. भोसले, जे. पी. निकम, एन. डी. कांबळे, एच. व्ही. पारखी, एन. बी. सुसलादे, डी. आर. जगताप, व्ही. ए. लिलके, श्रीमती व्ही. एस. गायकवाड, पी. जी. वाघ, बी. सी. नगराळे, जी. बी. सूर्यवंशी यांचा समावेश आहे. पदोन्नती मिळून नाशिक येथे बदलून आलेल्या नायब तहसीलदाराची तातडीने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या रिक्तपदी नेमणूक करावी असे आदेश देण्यात आले असून, निवडणूक नायब तहसीलदार, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे रिक्त पद भरावे व त्यानंतर आवश्यकतेनुसार अन्य पदांवर नेमणुका कराव्यात, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.