यांत्रिकी झाडूचा प्रस्ताव बारगळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:20 AM2017-07-29T01:20:12+5:302017-07-29T01:20:12+5:30
नाशिक : महापौरांसह पदाधिकाºयांनी औरंगाबाद येथे यांत्रिकी झाडूची प्रात्यक्षिके बघितल्यानंतर सहाही विभागांत झाडू खरेदीची चर्चा सुरू झाली असतानाच त्याला सफाई कामगारांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. सफाई कामगारांच्या संघटनांनी महापौर आणि आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यानंतर, महापौर रंजना भानसी यांनी सफाई कामगारांच्या भरतीनंतरच यांत्रिकी झाडू खरेदीबाबत विचार करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे, यांत्रिक झाडू खरेदीचा प्रस्ताव बारगळल्यातच जमा आहे. शहरात सफाई कामगारांची अपुरी संख्या आणि सफाई व्यवस्थेवर येणारा ताण लक्षात घेता महापौरांनी यांत्रिकी झाडू खरेदीबाबतचा विचार बोलून दाखविला होता. त्यानुसार, औरंगाबाद येथे कार्यरत यांत्रिकी झाडूची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी महापौरांसह पदाधिकारी दोन दिवसांपूर्वी जाऊन आले होते. सदर यांत्रिकी झाडूंची खरेदी सहाही विभागांत भाडेतत्त्वावर घेण्याची चर्चा सुरू झाली असतानाच महानगरपालिका सफाई कामगार संघर्ष समिती तसेच अखिल भारतीय श्री वाल्मीकी नवयुवक संघाने महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते व आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेऊन यांत्रिकी झाडू खरेदी करण्यास तीव्र विरोध दर्शविला. याशिवाय, सफाई कामगारांची रोजंदारीवर भरती करण्यासंबंधीचा महासभेचा प्रस्ताव शासनाने विखंडित केलेला आहे. त्यावर शासनाला तातडीने अभिवेदन पाठवावे, कामगारांची भरतीप्रक्रिया तातडीने राबवावी आदींसह सफाई कामगारांना गणवेश, गमबूट, रेनकोटचे वाटप करावे आदी मागण्याही मांडण्यात आल्या. त्यावर, महापौर रंजना भानसी यांनी सफाई कामगारांची भरती केल्यानंतरच यांत्रिकी झाडू बाबतचा विचार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले तर आयुक्तांनी अन्य मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे मान्य केले. शिष्टमंडळात सुरेश दलोड, सुरेश मारू यांच्यासह अनिल बहोत, सतीश टाक, सोनू कागडा, पापू तसांबड आदींचा समावेश होता.
सुरक्षाव्यवस्था तैनात
अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी आयुक्तांच्या भेटीत केलेल्या कारनाम्यामुळे आयुक्तांच्या दालनासमोरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.२८) सफाई कामगारांच्या संघटनांचे कार्यकर्ते कामगारांसह मोठ्या संख्येने आयुक्तांच्या दालनासमोर जमा झाले. त्यामुळे सुरक्षारक्षकांनी आयुक्तांच्या दालनाचा मुख्य दरवाजावरच कामगारांना रोखून धरले आणि निवडक प्रतिनिधींनाच आत प्रवेश दिला. तत्पूर्वी, सफाई कामगारांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर आपल्या मागण्यांप्रश्नी घोषणाबाजी केली.