येळकोट येळकोटच्या जयघोषात चंदनपुरीच्या यात्रोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 05:32 PM2019-01-21T17:32:47+5:302019-01-21T17:34:02+5:30
प्रतिजेजुरी समजल्या जाणाऱ्या खंडेराव महाराज व बाणाई माताचे श्रीक्षेत्र चंदनपुरी येथे पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर यात्रोत्सवास प्रारंभ झाला. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, अनिता भुसे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सभापती प्रतिभा सूर्यवंशी, तहसिलदार ज्योती देवरे, चंदनपुरीच्या सरपंच योगिता अहिरे, जय मल्हार ट्रस्टचे सतीश पाटील, राजेंद्र पाटील, राजु अहिरे उपस्थित होते.
येळकोट येळकोट जय मल्हारच्या निनादाने मल्हार भक्तांनी चंदनपुरी क्रोशी दुमदुमून गेली. यावेळी खोबरे व भंडारा उधळणमुळे परिसरास सोनेरी किनार प्राप्त झाली आहे. शहरासह कसमादे परिसर खान्देश, मध्यप्रदेश व गुजरात येथील मल्हार भक्तांमध्ये श्रीक्षेत्र चंदनपुरी प्रसिद्ध आहे. पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर चंदनपुरी मंदिरात विविध धार्मिक विधी करण्यात आले. पहाटे काकड आरती, गावात मुखवटा मिरवणूक काढण्यात आली. नृत्यांच्या तालावर मल्हार भक्तांनी ठेका धरला. येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा देत संपूर्ण चंदनपुरी गावात पालखी मिरवण्यात आली. नंतर मुखवट्यांची यथासांग पूजन करीत मंदिरात महापूजा मान्यवरांच्याहस्ते करण्यात आली. आज यात्रेच्या पहिल्या दिवसात पहाटे पासून मल्हार भक्तांनी खंडेरायाचे दर्शनासाठी रांग लावली होती तर काही दूरवरचे गावोगावचे मल्हार भक्त पहिल्या दिवशी देव भेट, काठी नाचवणे आदिंना महत्व देतात. त्यामुळे त्यांनी काल सायंकाळ, रात्री पासूनच चंदनपुरीकडे प्रस्थान केले. पहाटे मंदिरात गर्दी उसळली तसेच चंदनपुरीत पहिल्याच दिवशी एक लाखाहून अधिक मल्हार भक्तांनी हजेरी लावली. चंदनपुरी यात्रोत्सव निमित्त जय मल्हार ट्रस्ट, चंदनपुरी ग्रामपंचायत, महसुल विभाग, पोलीस प्रशासनातर्फे आपापल्या विभागानुसार जय्यत तयारी केली आहे.