यशोधरा महिला संस्थेवर फसवणूक केल्याचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:44 AM2019-09-10T00:44:13+5:302019-09-10T00:44:32+5:30
दि यशोधरा महिला सहकारी औद्योगिक उत्पादक संस्थेच्या संचालकांनी फसवणूक करून पैशांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकरोड : दि यशोधरा महिला सहकारी औद्योगिक उत्पादक संस्थेच्या संचालकांनी फसवणूक करून पैशांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निफाड तालुक्यातील शिवडी येथील मीराबाई नाना गायकवाड यांनी फिर्यादित म्हटले आहे की, नाशिकरोडच्या चेहेडी पंपिंग संगमेश्वरनगर, कोतकर बंगला येथे यशोधरा महिला सहकारी संस्था आहे. संस्थेमार्फत मीराबार्इंचा मुलगा सोमनाथ गायकवाड २००८ मध्ये सहा महिन्यांसाठी वसंतराव पवार मेडिकल कॉलेजच्या कॅन्टिनमध्ये काम करत होता. संस्थेच्या संचालक संगीता अनिल दशपुते, गीतांजली चंद्रकांत निकम, भाग्यश्री अनिल दशपुते, कल्पना चिंचोले, सरला राजेंद्र कोतकर, आरती छगनराव जाधव, चैताली सोनवणे, मालती मोरे, जाकिरा काजी आदींसह ३६ संचालकांनी कामगार सोमनाथ याला पीएफ व ईएसआयसीच्या वारस
नोंदणीसाठी आईचे नाव लावायचे आहे, यासाठी मतदान कार्ड, फोटो आदी कागदपत्रे घेऊन खोटे दस्तऐवज, खोटा रहिवासी दाखला तयार करून संमतीशिवाय संस्थेचे संचालक बनवले. संचालक म्हणून बनावट अंगठे घेऊन विविध शासकीय, निमशासकीय व देवस्थानच्या निविदा प्राप्त करून घेऊन शासनाची फसवणूक केली. तसेच त्यातून मिळणाऱ्या पैशांचा अपहार केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.