यशवंतरावांमुळेच सत्तेचे विकेंद्रीकरण

By admin | Published: March 12, 2016 11:55 PM2016-03-12T23:55:57+5:302016-03-13T00:10:18+5:30

शरद पवार : मुक्त विद्यापीठात राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन

Yashvantrao is the reason for decentralization of power | यशवंतरावांमुळेच सत्तेचे विकेंद्रीकरण

यशवंतरावांमुळेच सत्तेचे विकेंद्रीकरण

Next

नाशिक : यशवंतराव चव्हाण यांचा सत्तेच्या विकेंद्रीकरणावर प्रचंड विश्वास होता. सत्ता, निर्णय घेण्याची प्रक्रिया शेवटच्या माणसाच्या हातात असावी, या विचाराने त्यांनी राज्यात पंचायतराजच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्यामुळेच पंचायत समित्या, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांतून पुढे कर्तृत्ववान राजकीय पिढी घडल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.
येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखेच्या वतीने आयोजित ‘यशवंतराव चव्हाण आणि आधुनिक महाराष्ट्र’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती संग्रहालयाचे उद्घाटन, तसेच विशाखा काव्य व रुक्मिणी पुरस्कारांचे वितरणही यावेळी पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी यावेळी यशवंतरावांच्या आठवणींना उजाळा दिला, त्यांचे अनेक किस्से सांगितले आणि आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीतील त्यांचे योगदानही अधोरेखित केले. ते म्हणाले, यशवंतराव हे जगावेगळे व्यक्तिमत्त्व होते. सुरुवातीला त्यांना प्रचंड संघर्षाला तोंड द्यावे लागले. सामाजिक सुधारणा की स्वातंत्र्यासाठी लढा, असे द्वंद्व त्यांच्या मनात सुरू झाले आणि त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेऊन तुरुंगात यातना, मारझोड सहन केली. त्याचा त्यांच्या शरीरावर कायमचा परिणाम झाला. १९४८ मध्ये त्यांनी राज्य परिवहन महामंडळाची स्थापना केली. १९५६ मध्ये विधिमंडळाचे नेतृत्व त्यांच्याकडे आले. अत्यंत अस्वस्थतेच्या काळात त्यांनी राज्य सांभाळले. गुजरात व महाराष्ट्र वेगळे होऊ नये, अशी नेहरूंची इच्छा होती; मात्र चव्हाणांनी अत्यंत कौशल्याने इंदिरा गांधींमार्फत नेहरूंचे मन वळवले आणि १९६० मध्ये महाराष्ट्राची निर्मिती घडवून आणली. राज्य स्थापनेनंतरही त्याला दिशा देताना ‘पंचायतराज’ची स्थापना करीत महाराष्ट्रात कर्तृत्वान राजकीय नेत्यांची पिढी घडवली. विकेंद्रित प्रशासनाचा आदर्श त्यांनी घालून दिला. सामान्य माणसातून उद्योजक घडवण्यासाठी सहकारी चळवळीला बळ दिले. अत्यंत भावनाशील व्यक्तिमत्त्व असलेल्या चव्हाणांना वाचनाची अतोनात आवड होती. त्यांचे निधन झाल्यावर त्यांच्याकडे फक्त नऊ एकर जमीन, बॅँकेत २७ हजार रुपये व पाच हजार ग्रंथ होते.
कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. माजी मंत्री अण्णा डांगे, यशवंतरावांचे चरित्रकार रामभाऊ जोशी, आमदार हेमंत टकले, सीमा हिरे, जयवंत जाधव, ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विजयश्री चुंभळे, बापूसाहेब पुजारी, कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे, डॉ. शरणकुमार लिंबाळे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रफुल्ल चिकेरूर यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे यांनी आभार मानले.
विशाखा, रुक्मिणी पुरस्कारांचे वितरण
मुक्त विद्यापीठाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विशाखा काव्य व रुक्मिणी पुरस्कारांचे वितरण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कुडाळ (जि. रत्नागिरी) येथील कवी अरुण नाईक यांना २१ हजारांचा प्रथम पुरस्कार, माळशिरस (जि. पुणे) येथील बालिका ज्ञानदेव यांना पंधरा हजार रुपयांचा द्वितीय पुरस्कार, तर जळगाव येथील ‘लोकमत’च्या वरिष्ठ मुद्रित शोधक डॉ. अस्मिता गुरव यांना दहा हजार रुपयांच्या तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे येथील प्रेरणा सहाने यांना २१ हजार रुपयांच्या रुक्मिणी पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच प्रा. आनंद पाटील यांच्या ‘ग्रंथांनी रचलेला महापुरुष’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
(फोटो : १२ पीएचएमआर ७५ : शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना डॉ. अस्मिता गुरव.)
‘गांधीवध नको, हत्त्या म्हणा...’
‘गांधीहत्त्या झाल्यावर देशात दंगली पेटल्या असता, यशवंतरावांचे कऱ्हाड मात्र शांत होते’ असे सांगताना कुलगुरू डॉ. साळुंखे यांच्या तोंडून ‘गांधीवध’ असा शब्द निघाला. त्यावर पवार यांनी त्यांना अडवत ‘गांधीवध’ नव्हे, ‘गांधीहत्त्या’ म्हणा, असे सुचवले. आपल्या भाषणात खुलासा करताना पवार म्हणाले, वध हा राक्षसाचा होतो. गांधींची हत्त्या करणाऱ्यांच्या मनात तसे विचार असल्याने या घटनेला त्यांनी ‘गांधीवध’ असे संबोधले. आपण शक्यतो कोणाला भाषण करताना अडवत नाही; पण न राहावल्याने बोलल्याचे पवार म्हणाले.

‘जलयुक्त’साठी विद्यापीठ देणार प्रशिक्षण
महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचे सर्व जिल्ह्णांतील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणार असल्याची घोषणा कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केली. तसेच सहकारविषयक प्रशिक्षण सुरू केले जाणार असून, याबाबत सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाल्याचेही ते म्हणाले.

शरद पवार म्हणाले...
* यशवंतराव मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या आईने विठाबाईने विचारले, ‘मुख्यमंत्री झाला म्हणजे रावसाहेबांपेक्षा (तहसीलदार) मोठा झाला का?’
* यशवंतरावांची भाषणे ऐकणे ही आमच्यासाठी चैन होती. १९५८ साली त्यांची भाषणे ऐकण्यासाठी आम्ही तीस-चाळीस मैल सायकलने जायचो.
* यशवंतरावांची गाडी अडवून त्यांना एका फाटक्या म्हातारीने ‘खाऊ’साठी चांदीचा रुपया दिला होता. तो त्यांनी आयुष्यभर जपला.
* विधिमंडळात कसे वागावे, याचा आदर्श यशवंतरावांमुळे मिळाला. आपल्या सहकाऱ्याने केलेल्या चुकीबद्दलही ते माफी मागत. त्यामुळे गेली ४८ वर्षे विधिमंडळात असूनही मी कधीच आपली जागा सोडली नाही.

तेव्हा ‘खुळखुळा’ म्हटले होते!
दिल्लीच्या इंदिरा गांधी विद्यापीठाच्या खालोखाल मुक्त विद्यापीठाचा दर्जा, व्याप्ती व योगदान असल्याचे गौरवोद्गार काढताना पवार यांनी विद्यापीठाच्या स्थापनेचा किस्सा सांगितला. स्थापनेच्या वेळी प्रचंड वाद उद्भवला. ते कोठे द्यावे, यावरून खल झाला. आपण मात्र हे विद्यापीठ नाशिकलाच व्हावे, अशी भूमिका घेतली. जागाही पाहिली. तेव्हा विरोधकांनी ‘विद्यापीठ मागितले; पण हातात खुळखुळा दिला’ अशी टीका केली होती; मात्र याच विद्यापीठाने आज लाखो वंचितांपर्यंत शिक्षण पोहोचवल्याचेही ते म्हणाले.

Web Title: Yashvantrao is the reason for decentralization of power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.